पुणे, पिंपरी-चिंचवडसारखी मोठी शहरे, बारामती-दौंडसह दहा नगरपालिका, औद्योगिक वसाहती या सर्वाची घाण सामावून घेणाऱ्या उजनी धरणाचे पाणी भयंकर प्रदूषित बनले असून, त्याचे अतिशय गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. पोटाचे विकार, रोगांच्या साथी याचबरोबर या पाण्यामुळे जनावरांच्या प्रजननक्षमतेवर विपरीत परिणाम झाले आहेत. जनावरे लवकर गाभण राहत नसल्याने व त्यांचा गर्भपात होत असल्याने या भागातील शेतकरी हैराण आहेत.
पुणे आणि सोलापूर जिल्ह्य़ांच्या सीमेवर भीमा नदीवर उजनी धरण आहे. त्याची पाणीसाठवण क्षमता सुमारे ११७ टीएमसी आहे. या धरणाला पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर शहरे-वसाहतींचे दूषित पाणी जाऊन मिळते. त्यात कुरकुंभ येथील रासायनिक उद्योग वसाहतीसह दहा औद्योगिक वसाहती, दहा नगरपालिका यांच्या दूषित पाण्याचा समावेश होतो. त्यामुळे उजनी भयंकर प्रदूषित बनले आहे. आता उजनी १०० टक्के भरले आहे. तरीसुद्धा जलाशयाला भेट दिली, तर लांबपर्यंत दरुगधी येते आणि पाण्याचा हिरवट रंग दिसतो. हे पाणी सगळीकडेच वापरले जाते, त्यामुळे परिसरातील भूजल व विहिरींचे पाणीसुद्धा दूषित बनले आहे. या पाण्यामुळे पोटाचे विकार, हगवण, टायफॉइड, कावीळ या रोगांच्या साथी नियमित असतात.
या पाण्याचे जनावरांच्या गर्भधारणेवर परिणाम होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. माढा तालुक्यातील फुटजवळगाव हे उजनीच्या जलाशयाच्या किनाऱ्यावरील गाव. तेथील प्रगत शेतकरी संजय हांडे यांनी सांगितले, ‘‘गेल्या तीन-चार वर्षांपासून जनावरे गाभण न राहण्याचे प्रमाण वाढले आहे. जनावरे बदलली, चारा बदलला, डॉक्टरांना दाखवले, तरी काही फरक पडला नाही. तीच जनावरे बार्शीला पाठवली तर नियमित गाभण राहू लागली. शेवटी समजले ही समस्या प्रदूषित पाण्याची आहे.’’ असाच अनुभव पंढरपूर तालुक्यातील जागृती अॅग्रो शेळीफार्मचे संचालक प्रतापसिंह चंदनकर यांनीही बोलून दाखवला. ‘‘आम्हाला उजनीच्या कालव्याचे व भीमा नदीचे दूषित पाणी वापरावे लागते. शेळय़ांना हेच पाणी द्यावे लागते. त्यामुळे बऱ्याचशा शेळय़ा गाभण राहत नाहीत, राहिल्या तरी त्यांचा गर्भपात होतो,’’ असे त्यांनी सांगितले. उजनीच्या पाण्यावरील बहुतांश शेतकरी अशा समस्या मांडतात.
‘दूषित पाण्याचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो,’ असे पटवर्धन-कुरोली येथील पशुवैद्यक डॉ. आगतराव उपासे यांनी सांगितले. ‘‘दूषित पाण्यामुळे जनावरांना हगवणीची लागण झाली असेल, तर त्याच्यामुळे जनावरे कुंथतात, त्यामुळे गर्भपात होऊ शकतो. पाण्यातील विषाणू-जीवाणूंमुळे त्यांच्या गर्भधारणेवरही विपरित परिणाम होऊ शकतो,’’ असे डॉ. उपासे म्हणाले.
या समस्येबाबत शेतकरी चौकशीची मागणी करत आहेत. माढा तालुक्यात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेनेही या कारणांचा सखोल व वैज्ञानिक अभ्यास करण्याची मागणी केली आहे. उजनीच्या प्रदूषणाच्या प्रश्नामुळे या भागातील माणसाचे, जनावरांचे आरोग्य तसेच, अर्थकारणही धोक्यात आले आहे. त्यामुळे हा अभ्यास गरजेचा आहे, असे या संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले.
‘पथक पाठवून पाहणी करू’
याबाबत दुग्ध व पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त एकनाथ डवले यांनी सांगितले, की अशी समस्या असल्यास त्या भागात पथक पाठवून पाहणी केली जाईल व आवश्यक त्या चाचण्या घेऊन कारणे शोधण्यात येतील.