पूजा चव्हाण प्रकरणी मी माणुसकीच्या दृष्टीने घटनेच्या दिवशी मी मदत केली. त्याच दिवशी घटनास्थळी असलेला मोबाईल पोलिसांकडे देखील दिला. पण आता माझ्यावर पोलीस संशय घेऊन माझ्याकडे त्या तरुणीचा लॅपटॉप असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मला त्याबाबत नोटीस बजावण्यात आली असून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धक्कादायक खुलासा स्थानिक भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांनी आज(शनिवार) वानवडी पोलिसांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना केला.

पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मागील २५ दिवसांत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणावर राजकारण झालं असून, महाविकासआघाडी मधील मंत्री संजय राठोड या आत्महत्येला जबाबदार असल्याचे देखील बोलले गेले. त्यावर राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. आता त्याच दरम्यान वानवडी परिसरातील भाजपाचे स्थानिक नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे मृत्यू झालेल्या तरुणीचा लॅपटॉप असल्याचा संशय वानवडी पोलिसानी व्यक्त केला आहे. त्या संदर्भात घोगरे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील दोन्ही अर्ज न्यायालयाने फेटाळले

या पार्श्वभूमीवर आज(शनिवार) वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांची महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनील कांबळे, स्थानिक नगरसेवक धनंजय घोगरे यांनी भेट घेऊन योग्य तपास करावा. ज्या धनराज घोगरे यांनी मदत केली, त्यांनाच नोटीस पाठवली ही बाब चुकीची असल्याचे निवेदन देण्यात आले.

आरोपी मोकाट आणि मदत करणाऱ्याला पोलिसांची नोटीस : जगदीश मुळीक
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येच्या दिवशी भाजपाचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी मदत केली. पण त्यानंतर आता त्यांनाच नोटीस बजाविण्यात आली असून ही निषेधार्थ बाब आहे. यातून एकच स्पष्ट होते की, आरोप मोकाट फिरत आहेत आणि मदत करणार्‍याला नोटीस दिली जाते हा कुठला न्याय? असा सवाल भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचा पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा न लावल्यास राज्यभरात आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी सरकारला दिला.