परळीतील युवतीने इमारतीतील सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केल्याप्रक रणात पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असून राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान, याप्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांकडून चौकशीचा अहवाल मागविला आहे.

आत्महत्या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश पोलीस महासंचालक नगराळे यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत.

परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड तपास करत आहेत. याप्रकरणात  अद्याप तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. याप्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पूजाच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप  समजू  शकले नाही. याप्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  पूजा इंग्रजी संभाषण कौशल्य अभ्यासक्रमासाठी शहरात आली होती. पूजा, तिचा चुलत भाऊ आणि एक मित्र हेवन पार्क परिसरातील सदनिकेत राहत होते. रविवारी (७ फेब्रुवारी) मध्यरात्री तिने सदनिकेतील बाल्कनीतून उडी मारली.  याप्रकरणात तिचा चुलतभाऊ आणि मित्राचा  जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.  याप्रकरणात अद्याप तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार नोंदविण्यात आली नाही.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्येमागे एक मंत्री असल्याचे मोबाइलवरील संभाषणावरून स्पष्ट झाले आहे. तरुणीचा लॅपटॉप स्कॅन केल्यास आणखी पुरावे बाहेर येतील. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सरकारचे कर्तेधर्ते शरद पवार यांनी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करावी.’अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

तपासानंतर महिला आयोगाकडे अहवाल सादर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांना पत्र पाठविले आहे. तपासानंतर आम्ही त्यांना अहवाल पाठविणार आहोत, असे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.