मूळची पुण्याची आणि सध्या लंडनमध्ये स्थायिक असलेल्या पूजा जितेंद्र रानडेने बौद्धिक क्षमतेची उच्चतम समजल्या जाणाऱ्या मेन्सा बुद्धय़ंक चाचणीत १६२ टक्के गुण मिळवले आहेत. या यशामुळे तिला आता ‘मेन्सा’ या सर्वात बुद्धिमान लोकांच्या संघटनेचे सदस्यत्व मिळणार आहे.
‘मेन्सा’ ही असामान्य बुद्धय़ंक असणाऱ्या लोकांची संघटना आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी बुद्धय़ंक चाचणी परीक्षा घेतली जाते. लंडनमधील ‘रॉयल लॅटिन स्कूल’मध्ये शिकणाऱ्या बारा वर्षीय पूजाने यंदा ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत तिला १६२ टक्के गुण मिळाले आहेत. पूजाबरोबरच नेहा रामू या मूळच्या भारतीय वंशाच्या मुलीलाही तिच्याएवढेच गुण मिळालेले आहेत. या वयोगटातील आजवरचा हा सर्वोच्च निकाल आहे. जगातील सर्वात बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या आइनस्टाइन आणि स्टिफन हॉकिंग यांच्यापेक्षाही हा बुद्धय़ंक जास्त समजला जातो.
मुळची पुण्याची असलेली पूजा तिच्या आई-वडिलांबरोबर ब्रिटनमध्ये २००७ पासून राहत आहे. तिचे वडील येथील एका आयटी कंपनीत नोकरी करतात, तर आई आरती गृहिणी आहे. शालेय पातळीपासून हुशार असलेल्या पूजाला अभ्यासाव्यतिरिक्त बॅडमिंटन, नेटबॉल आणि बास्केटबॉल आदी खेळांमध्ये विशेष रुची आहे.