पुण्यात बांधकाम क्षेत्रातील मंदीची अनेक कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख आहे, नागरिकांच्या उत्पन्नात वर्षांला जितकी वाढ होते, त्यापेक्षा कितीतरी जास्त वाढ सदनिकांच्या दरात झाली आहे. ढोबळमानाने सांगायचे तर लोकांचे पगार किंवा उत्पन्नात ५ टक्के वाढ झालेली असताना सदनिकांच्या किमती मात्र १५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. उत्पन्न आणि सदनिकांच्या किमतीतील तफावत कमी झाल्याशिवाय घरांच्या बाजारात पुन्हा तेजी येणार का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे.
स्थावर मालमत्ता क्षेत्रातील बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी असलेल्या ‘जोन्स लँग लसाल’ या कंपनीच्या आकडेवारीने यावर प्रकाश टाकला आहे. या कंपनीच्या संशोधन विभागाचे प्रमुख आशुतोष लिमये यांनी सांगितले, की पुण्यातील सदनिकांचे सरासरी दर एका वर्षांत (प्रति चौरस फूट) ८६०० रुपयांवरून ९४०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. ही वाढ ९.५ टक्क्यांची आहे. ही सरासरी दरवाढ असली तरी बऱ्याचशा भागात ती १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याचबरोबर बांधकामाचा खर्चही १५ टक्क्यांनी वाढला आहे. त्याला मजुरी, बांधकाम साहित्य, जमीन यांचे वाढलेले दर कारणीभूत आहेत. त्यामुळे सदनिकांचे दर फार कमी करण्यास बांधकाम व्यावसायिक उत्सुक नाहीत. विशेषत: ज्या व्यावसायिकांनी आता जमीन खरेदी केली आहे, त्यांना यात मोठी अडचण येत आहे. दुसरीकडे लोकांची खरेदी करण्याची क्षमता या प्रमाणात वाढलेली नाही. पगार किंवा उत्पन्न सरासरी ५ टक्क्यांनी वाढले आहे. उत्पन्न व दर यात ही तफावत असल्यामुळे व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे.
दरवाढ कोणत्या भागात किती?
गेल्या वर्षभरात पुण्याच्या विविध भागांत सदनिकांच्या दरात वेगवेगळी वाढ झाली आहे. पुण्याच्या वायव्य (उत्तर-पश्चिम) म्हणजे औंध, बाणेर, रावेत, बालेवाडी भागात आणि ईशान्य (उत्तर-पूर्व) म्हणजे खराडी, चंदननगर या भागात जास्त वाढ आहे. मध्य पुण्यात म्हणजे डेक्कन, शिवाजीनगर, पेठा, स्वारगेट येथे ती सर्वात कमी आहे.
विविध भाग व वर्षभरातील दरवाढ अशी-
औंध, बाणेर, रावेत, बालेवाडी               १५.६ टक्के
चंदननगर, खराडी, आदी.                    १६.७ टक्के
मध्य पुणे                                          ०९.३ टक्के
कोंढवा, उंड्री, पिसोळी, आदी.               १२.५ टक्के
सिंहगड रस्ता, कर्वेनगर, कोथरूड        १२.६ टक्के
पिंपरी-चिंचवड                                   १२ टक्के
 
बांधकाम व्यावसायिकही अडचणीत
या मंदीमुळे सदनिका खरेदीचे व्यवहार कमी झाले आहेत. त्यामुळे-
१. अनेक मोठय़ा व्यावसायिकांना कामगारांना पगार देणेही कठीण बनले आहे. ते काही महिन्यांसाठी थांबले आहेत.
२. विविध पुरवठादारांना द्यावयाची देणी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी थकवली आहेत.
३. बँकांचे हप्ते व खासगी वित्तपुरवठादारांना द्यावयाच्या व्याजासाठी मुदत वाढवून घेतली आहे.
४. जमीन खरेदीचे नवे व्यवहार लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, बाणेर व आसपासच्या भागात दररोज चार भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, ते घ्यायला कोणी तयार नाही.

 ‘उलाढालीसाठी पूरक वातावरण नाही’
सद्य:स्थितीला मंदी म्हणण्यापेक्षा हा जागतिक आणि देशी अर्थव्यवस्थेचा परिणाम आहे. त्यातही बांधकाम क्षेत्रात ग्राहकांच्या प्रतिसादामुळे निर्माण होणाऱ्या उलाढालीमध्ये चढउतार तर असणारच. ही उलाढाल होण्यासाठी सध्या पूरक वातावरण नाही, असे म्हणता येईल.
आवाक्याबाहेर गेलेले घरकर्जाचे व्याजदर, जमिनींच्या किमती व विविध करांचा वाढता बोजा, आवाक्याबाहेर जात असलेल्या घरांच्याकिमती, महागाई, बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमती, बांधकाम मंजुरीसाठी लागणारा उशीर अशा अनेक घटकांचा परिणाम व्यवहार कमी होण्यावर झाला आहे. मात्र, जसजशा वरील घटकांवरील उपाययोजना अमलात येतील तशी परिस्थिती पूर्ववत होईल. हा पूर्णपणे केंद्र शासन, राज्य शासन व भारतीय रिझव्र्ह बँकेच्या अखत्यारित असणारा विषय आहे.
पुणे शहर व परिसरात आजही घरांचा मागणी तेवढा पुरवठा होत नाही, त्यामुळे किमती कमी होण्याचे काही कारण आहे असे वाटत नाही. मात्र, किमती कमी झाल्या असत्या तर चित्र वेगळे असते.
– सुधीर दरोडे
अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन, पुणे.
 
इतर शहरांच्या मानाने बरी स्थिती
पुण्यात मंदी असली तरी देशातील इतर शहरांच्या तुलनेत स्थिती बरी आहे. पुण्यात सदनिकांच्या विक्रीमध्ये आणि नव्याने उभ्या राहणाऱ्या सदनिकांमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील प्रमुख शहरांचा विचार करता तिथे हे प्रमाण सुमारे २० ते २५ टक्क्यांपर्यंत आहे. संपूर्ण देशातच मंदीचे वातावरण आहे. त्या तुलनेत पुणं जरा बरं आहे इतकंच.. असे आकडेवारी सांगते.