नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला सोमवारी पुण्यामध्ये प्रतिसाद मिळाला नाही. लक्ष्मी रस्त्यासह काही बाजारपेठा सोमवारी बंद असल्याने बंदचा परिणाम दिसला नाही. तसेच शहरातील अन्य सर्व दुकाने आणि घाऊक बाजारपेठा तसेच पीएमपी, रिक्षा आदी सेवा सोमवारी नियमितपणे सुरू होत्या. दोन दिवसांनंतर उघडलेल्या बँकांसह शहरातील सर्व ठिकाणी व्यवहार सुरळीत पार पडले.

केंद्र सरकारने लागू केलेल्या नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रास आणि अस्वस्थतेच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनामध्ये मोजकेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, सोमवारी शहरातील बाजारपेठांना साप्ताहिक सुट्टी असल्याने दुकाने बंदच होती. शनिवार-रविवारच्या सुट्टीनंतर उघडलेल्या बँकांमध्येही नित्यनेमाचे व्यवहार सुरळीतपणे झाले. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक राजकीय कार्यकर्त्यांना बंद असल्याचा विसर पडला आणि नंतर कडकडीत बंद पुकारण्याच्या घोषणेचाच विरस झाला.

महात्मा फुले मंडई येथे लोकमान्यांच्या पुतळ्यास काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर काँग्रेसतर्फे आयोजित जनआक्रोश मोर्चाची सुरुवात झाली. बेलबाग चौकमार्गे लक्ष्मी रस्त्याने संत कबीर चौक, क्वार्टर गेट, बच्चू अड्डा या मार्गाने महात्मा गांधी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सभा घेऊन मोर्चाची सांगता झाली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, उल्हास पवार, विश्वजित कदम, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड यांच्यासह पक्ष कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे टिळक चौकात निदर्शने करण्यात आली. खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, सुभाष जगताप, रूपाली चाकणकर यांच्यासह पक्ष कार्यकर्ते आक्रोश आंदोलनात सहभागी झाले होते.