25 February 2021

News Flash

‘पॉप्युलर बुक हाऊस’ लवकरच काळाच्या पडद्याआड

व्यवहाराची पुस्तकप्रेमावर सरशी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

चार ते पाच वर्षांपासून पुस्तके विक्रीचे प्रमाण घटल्याचा परिणाम; व्यवहाराची पुस्तकप्रेमावर सरशी

सहा दशकांहून अधिककाळचे इंग्रजी पुस्तकांचे पुण्यातील माहेरघर.. पेंग्विन आणि पेलिकन या पाश्चात्त्य प्रकाशनगृहाची सर्व प्रकाशने मिळण्याचे हमखास ठिकाण.. केवळ इंग्रजीच नाही तर, मराठी आणि हिंदी पुस्तकांचे सुसज्ज दालन.. डेक्कन जिमखान्यावरील पुस्तकप्रेमींचा गप्पांचा अड्डा.. मुलांसाठी खेळणी, सीडी, गोष्टीची पुस्तके या आकर्षित करणाऱ्या गोष्टींचे हक्काचे स्थान.. अशी वैशिष्टय़े असलेले आणि ग्रंथप्रेमींच्या पुण्याची वेगळी ओळख असलेले ‘पॉप्युलर बुक हाऊस’ वाचनसंस्कृती लोप पावल्याच्या कारणास्तव काळाच्या पडद्याआड जात आहे. हे दुकान बंद करण्याचा निर्णय घेताना दु:ख तर आहेच. पण, पुस्तकप्रेम आणि व्यवहार यामध्ये व्यवहाराची सरशी झाली, अशी भावना या दुकानाचे भागीदार सुनील गाडगीळ यांनी व्यक्त केली.

गेल्या चार-पाच वर्षांपासून पुस्तकांच्या विक्रीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. वाचनप्रेमी ग्राहक दुकानामध्ये येईनासे झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तोटा सहन करीत आणखी किती काळ दुकान सुरू ठेवायचे ही चिंता भेडसावत होती. ग्राहकांअभावी पुस्तकांची विक्री होत नसल्याच्या कारणास्तव काही कर्मचाऱ्यांना कमी करण्याची वेळ आमच्यावर आली. गेल्या वर्षभर विचार केल्यानंतर आता हे दुकान बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पुस्तकप्रेम आणि व्यवहार या दोन गोष्टींमध्ये व्यवहार महत्त्वाचा ठरला, असे सुनील गाडगीळ यांनी सांगितले. दुकानातील उर्वरित माल वितरकांकडे पोहोचविल्यानंतर चार-पाच दिवसांत दुकान औपचारिकरीत्या बंद होणार आहे. लवकरच आम्ही एका नव्या स्वरूपात पुणेकरांसमोर येणार आहोत, असे गाडगीळ यांनी सांगितले.

माधव लक्ष्मण गाडगीळ यांनी १० ऑक्टोबर १९५४ रोजी पॉप्युलर बुक हाऊसची स्थापना केली. या व्यवसायाने आम्हाला एक ओळख दिली. लेखक, खेळाडू, अभिनेते, राजकीय  नेते,  उद्योगपती,  गायक , शास्त्रज्ञ, शासकीय आणि पोलीस अधिकारी अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे पाय आमच्या उंबऱ्याला लागले. त्यातील बऱ्याच जणांशी आमची चांगली मैत्री झाली जी अजूनही टिकून आहे. पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले, पं. हृदयनाथ मंगेशकर, अनुराधा पौडवाल, बाळासाहेब ठाकरे यांनी दुकानाला भेट दिली होती. देशा-परदेशातील वाचक पुण्यात आले की मुद्दाम आमच्या दुकानात येऊन जात. तीन-चार पिढय़ांशी आम्ही जोडलो गेलो आहोत, असे सांगून गाडगीळ म्हणाले, पुस्तकांबरोबरच काळानुसार आम्ही कायमच वेगवेगळे प्रयोग केले. संगणक, व्यवस्थापन, हिंदी या  विषयांची पुस्तके, सीडीज, व्हीसीडीज, डिव्हीडीज, ऑडिओ बुक्सनंतर किंडल, पेन ड्राईव्हज, सारेगामा कारव्हा याची  विक्री आम्ही ग्राहकांसाठी  सुरू केली . पुण्यातील पहिले वातानुकूलन दुकान आणि व्यवहारात संगणकाचा पहिल्यांदाच वापर ही आमची खास वैशिष्टय़ ठरली. पहिले ऑनलाइन बुक स्टोअर सुरू केले होते. पण, त्यात आम्हाला सपशेल अपयश आले, असे गाडगीळ यांनी सांगितले.

पुस्तकांचे प्रकाशनही

काही प्रकाशक संस्थांच्या नवीन पुस्तकांचे प्रकाशन येथे झाले. अनेक पुस्तक प्रदर्शनात सहभाग असायचा. ‘दिवाळी धमाका सेल’, ‘न्यू इयर सेल’, ‘वन डे सेल’ हे खूप लोकप्रिय ठरले. वाचकांसाठी ती पर्वणीच असायची.

पॉप्युलर बुक हाऊस बंद करावे लागणार या कटू सत्याला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी केली आहे. ६४ वर्षे इतका प्रदीर्घ काळ  या व्यवसायाशी नाते होते. पुस्तके हेच आमचे जग होते. ते तुटणार म्हणून खंत आणि दु:ख आहे.   –  सुनील गाडगीळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2018 1:41 am

Web Title: popular book house ready to closed
Next Stories
1 पुणे क्षेत्रात सर्वाधिक तीन लाख घरे!
2 ‘अ ’वर्गाच्या महापालिकेला ‘ड ’वर्गाची नियमावली
3 कर्नाटक हापूसचा हंगाम लांबणीवर
Just Now!
X