News Flash

राज्यात पुन्हा तापमानवाढीची शक्यता

निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे राज्यातील तापमानात गेल्या आठवडय़ात मोठी वाढ झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : विदर्भ वगळता राज्यात इतरत्र सध्या दिवसाच्या कमाल तापमानात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत घट झाली असली, तरी दोन ते तीन दिवसांत तापमानाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विदर्भात ५ ते ७ एप्रिल या कालावधीत उष्णतेची दुसरी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे राज्यातील तापमानात गेल्या आठवडय़ात मोठी वाढ झाली होती. उत्तरेकडील काही राज्ये आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट होती. राज्यात कोकण विभागापाठोपाठ विदर्भातही उष्णतेची लाट आली होती. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत गेला होता. सध्या दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे.

मध्य महाराष्ट्रात सोलापूर वगळता इतरत्र तापमान सरासरीच्या जवळ आणि ४० अंश सेल्सिअसच्या खाली आहे. कोकण विभागातही बहुतांश ठिकाणी तापमान कमी झाले आहे.

विदर्भात मात्र सर्वत्र ४० ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. शनिवारी राज्यातील उच्चांकी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे ४३.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दोन दिवसांनंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, ५ ते ७ एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे. याच वेळी मध्य प्रदेशातही उष्णतेची लाट असणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागातही याच दरम्यान तापमानाचा पारा २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 12:10 am

Web Title: possibility of re warming in the state akp 94
Next Stories
1 Coronavirus – पुण्यात दिवसभरात ५ हजार ७२० करोनाबाधित वाढले, ३५ रूग्णांचा मृत्यू
2 पिंपरी-चिंचवडमध्ये मिनी लॉकडाउनला व्यापारी, नागरिकांकडून प्रतिसाद
3 पुण्यात गिरीश बापट पोलिसांच्या ताब्यात, ‘मिनी लॉकडाउन’च्या पहिल्याच दिवशी भाजपाचं आंदोलन
Just Now!
X