विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राज्यातील विद्यापीठांना शैक्षणिक वर्ष १८ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अंतिम वर्षांच्या परीक्षांचे निकाल विद्यापीठांकडून जाहीर झाल्यावर पुढील पंधरा दिवसांत पदव्युत्तर पदवीची प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होत असून, राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवीचे शैक्षणिक वर्ष १८ नोव्हेंबरपासून सुरू होण्याबाबत साशंकताच आहे.

राज्यातील विद्यापीठातील अंतिम वर्षांच्या परीक्षा ३१ ऑक्टोबपर्यंत सुरू राहणार आहेत.  विद्यापीठांना १८ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.  सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ‘नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर होतील. पण पदव्युत्तर पदवी प्रवेशांसाठी किमान पंचवीस दिवस लागू शकतात.’  ‘निकाल लवकर जाहीर होईल. पण अर्ज भरणे, गुणवत्ता यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष प्रवेश राबवणे ही प्रक्रिया तीन आठवडय़ात होऊ शकणार नाही, असे स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी सांगितले.

शैक्षणिक प्रक्रिया पूर्ण होणे, गुणवत्ता राखली जाणे, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपणे हा सुधारित वेळापत्रकामागील विचार आहे. मात्र विद्यापीठांनी पदव्युत्तर पदवीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर शैक्षणिक वर्ष सुरू करणे अपेक्षित आहे.

– डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, यूजीसी