करोना संकटकाळातील किराणा दरवाढीने घरखर्चाचे गणित बिघडलेल्या ग्राहकांना आता बटाटा दरवाढीने हैराण केले आहे. गेल्या महिन्याभरापासून बटाटय़ाच्या दरात सतत वाढ होत आहे. किरकोळ बाजारात त्याचे दर दुप्पट झाले आहेत.

मुंबई, ठाणे आणि पुणे येथील किरकोळ बाजारात बटाटय़ाचे दर २५ ते ३० रुपये किलोवरून ५० ते ५५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. उत्तरेकडील राज्यांतून बटाटय़ाची आवक कमी होत असल्याने आणखी चार महिने बटाटा तेजीत राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात उत्तम प्रतीच्या बटाटय़ाचा दर २५ ते ३० रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात बटाटा ५० ते ५५ रुपये किलोने विकला जात आहे. सध्या उत्तरेकडील राज्यातून बटाटय़ाची आवक घटल्यामुळे घाऊक बाजारात बटाटय़ाचा तुटवडा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मागणीच्या तुलनेत बटाटय़ाची आवक कमी होत असल्याने भाववाढ झाल्याची माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील बटाटय़ाचे व्यापारी राजेंद्र कोरपे म्हणाले, उत्तरेकडील राज्यांत बटाटय़ाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. आग्रा, इंदूर तसेच पंजाबमधील बटाटा आपल्याकडे येतो. गेल्या हंगामात उत्तरेकडील राज्यांत बटाटय़ाचे पीक अपेक्षेएवढे आले नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. परिणामी, घाऊक बाजारात दरवाढ झाली आहे. सध्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येणारा बटाटा शीतगृहातून विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचेही कोरपे यांनी सांगितले.

मुंबई-ठाण्यात आणखी दरवाढीची शक्यता

गेल्या आठवडय़ाभरापासून मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश हॉटेल, उपाहारगृहे आणि खानावळी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारांत बटाटय़ाची मागणी वाढली आहे. बटाटय़ाची आवक अशीच रोडावलेली राहिल्यास येत्या काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता ठाण्यातील विक्रेते रमेश सुतार यांनी व्यक्त केली.

कांद्यावर निर्यातबंदी

नवी दिल्ली : कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याचे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने सोमवारी अधिसूचनेद्वारे जाहीर केले. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचा तुटवडा जाणवू लागला असून, कांद्याचे भाव वाढले आहेत. करोनाकाळातील काही महिन्यांत मोठय़ा प्रमाणावर कांद्याची निर्यात करण्यात आली. सोमवारी कांद्याच्या भावात मोठी वाढ नोंदविण्यात आली. सटाणा बाजार समितीत प्रति क्विंटलला सरासरी ३६०० रुपये तर लासलगाव बाजारात २८०१ रुपये भाव कांद्याला मिळाला.