शौचालयासमोर बटाटा प्रतवारीचे काम

पुणे : मार्केटयार्डाच्या आवारात शौचालयासमोर बटाटा प्रतवारीचे काम करणाऱ्या आडत्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीने कारवाई केली. शौचालयासमोर बटाटा प्रतवारीचे काम केल्या प्रकरणी बाजार समितीकडून संबंधित आडत्याला ११ हजार ८०० रुपयांचा दंड केला आहे.

स्वच्छतागृहाजवळ बटाटा प्रतवारीचे काम केल्या प्रकरणी मे. राधा ट्रेडर्स गाळा क्रमांक २७४ यांच्यावर ११ हजार ८०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गुलटेकडी मार्केटयार्डातील बाजारआवारात शौचालयाच्या दारातच बटाटय़ाच्या गाडय़ांमधील माल उतरवून बटाटय़ांची निवडणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कोंडी, अस्वच्छता, गाळ्यांसमोर फळभाज्या लावून विक्री करणे असे प्रकार रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने नियमावली तयार केली आहे. तरीही स्वच्छतागृहाजवळच बटाटय़ाच्या गाडय़ा लावून बटाटा निवडणी आणि त्यांचे प्रतवारीनुसार वर्गीकरण केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेतली.

आडत्यांना जरब

बाजार आवारातील  गर्दी ओसरल्यानंतर दुपारच्या वेळेत स्वच्छतागृहाजवळ बटाटय़ाच्या गाडय़ा लावून निवडणी केली जाते. बटाटा उतरवून घेणाऱ्या आडत्याने शौचालयाजवळ बटाटा प्रतवारीचे काम केले होते. या कारवाईमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आडत्यांना जरब बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.