हिंजवडीत जाणाऱ्या रस्त्यांची चाळण; कामगार-नागरिक त्रस्त

पिंपरी : माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमुळे देशभरात लौकिक असलेल्या हिंजवडी ‘आयटी हब’ परिसरातील कंपन्यांना जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील वर्दळ सध्या कमी असली, तरी करोना महामारीवर लस तयार करणात सहभागी असलेल्या काही कंपन्या या परिसरात पूर्ण क्षणतेने कार्यरत आहेत. कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसह या भागातील नागरिक रस्त्यावरील खड्डय़ांमुळे त्रस्त झाले आहेत.

मुंबई-बंगळुरू बाह्य़वळण रस्त्यावरून हिंजवडी परिसराला जोडणारे दोन मुख्य रस्ते आहेत. वाकड येथील भुजबळ चौक आणि डांगे चौक चिंचवडकडून जाणाऱ्या भूमकर चौकातून जाणारा दुसरा मार्ग हे दोन मुख्य रस्ते आहेत. दोन्ही रस्त्यांचा काही भाग महापालिका, स्थानिक ग्रामपंचायत आणि पीएमआरडीच्या हद्दीत येतो. महापालिकेच्या हद्दीतील रस्ता अद्यापही चांगला असला तरी ग्रामपंचायत आणि पीएमआरडीएच्या हद्दीतील रस्त्याची खड्डय़ामुळे चाळण झाली आहे.

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील बहुतांश कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे तेथील रस्त्यांवर नेहमीसारखी वर्दळ नसतानाही त्या परिसरातील रस्त्याची पावसामुळे चाळण झाली आहे. वाकड येथील भुजबळ चौकापासून हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

सेल पेट्रोल पंप आणि शिवाजी चौकातील रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. पीएमआरडीए आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या रस्त्याकडे दोन्ही प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. हिंजवडी औद्योगिक परिसरामध्ये काही प्रमाणात औषधे निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत. हिंजवडी परिसरातील औषध निर्माण कंपन्यांमध्ये करोनावर लस तयार करणे सुरू आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खड्डय़ांमुळे कामावर जाण्यास उशीर होतो. तसेच खड्डय़ांमुळे अपघात होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे हिंजवडी परिसरातील रस्त्यांमध्ये असणारे खड्डे बुजवावेत, अशी मागणी तेथील कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

हिंजवडी परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. करोनामुळे या परिसरातील काही कंपन्या बंद आहेत. मात्र, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या सुरू आहेत. त्यामध्ये तीन ते चार हजार कर्मचारी काम करतात. अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांचा या खड्डय़ामुळे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण?

डॉ. भालचंद्र वैद्य, वरिष्ठ संशोधन, विकास अधिकारी, जिनोव्हा बायो फार्मासिटीकल लि. हिंजवडी

बंगळुरु- मुंबई बाह्य़वळ महामार्गालगतच्या सेवा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. याशिवाय हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना जोडणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन तो तातडीने दुरुस्त करावा.

राहुल कलाटे, नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका

दुरवस्था कुठे?

* मुंबई-बंगळुरु महामार्गाचे सेवा रस्ते

* भूमकर चौक ते हिंजवडी

* भुजबळ चौक ते हिंजवडी