News Flash

चार महिने रखडलेल्या रस्त्याचे काम चार तासांत

प्रभाग क्रमांक १२ मधील या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी बावीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

| July 30, 2015 03:20 am

मॉडेल कॉलनी प्रभाग क्रमांक १२ मधील बायोगॅस प्रकल्पासमोरच्या रस्त्याचे गेले चार महिने रखडलेले काम चार तासांत अचानक पूर्ण करण्यात आल्यामुळे हे काम पाहून रस्त्यावरून जाणारे नागरिक आता आश्चर्य व्यक्त करत आहेत. गेले चार महिने या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती आणि आयुक्तांकडे तक्रार जाताच अतिशय घाईगर्दीने चार तासांत रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली.
प्रभाग क्रमांक १२ मधील या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी बावीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या कामासाठी स्थानिक नगरसेविका नीलम कुलकर्णी या सातत्याने पाठपुरावा करत होत्या. मात्र रस्त्याचे काम ठेकेदाराकडून पूर्ण केले जात नव्हते. रस्त्यात मध्य भागातच मोठा खड्डा खणून ठेवण्यात आला होता. तसेच संपूर्ण रस्ताही उखडण्यात आला होता.
रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी करणारी नऊ निवेदने कुलकर्णी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. त्याबाबत त्यांनी मार्च महिन्यापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. उखडून ठेवलेला रस्ता, जागोजागी पडलेले खड्डे, साठलेले पाणी यामुळे नागरिकांची गैरसोय होत असूनही अधिकारी त्याकडे लक्ष देत नव्हते. तक्रार केल्यानंतर कधीतरी ठेकेदाराची दोन-चार माणसे जागेवर येऊन काम करत असत. मात्र संपूर्ण रस्त्याचे काम केले जात नव्हते. अखेर कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांना या सर्व माहितीचे निवेदन मंगळवारी सादर केले. या रस्त्याची जागेवर पाहणी करून काम मार्गी लावावे अशीही विनंतीही आयुक्तांना करण्यात आली होती. त्यानंतर रस्त्यावर काम सुरू झाले. अतिशय घाईगर्दीने दोन कामगारांना जागेवर पाठवले गेले आणि त्यांनी चार तास काम करून संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासह अन्य कामे पूर्ण केली. या कामांनंतर इतर अनेक कामे अद्यापही बाकी असली तरी ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत.
रस्त्याचे काम अतिशय वाईट पद्धतीने करणाऱ्या ठेकेदाराबाबत अधिकाऱ्यांचे धोरण बोटचेपेपणाचे असून त्यामुळेच कामात दिरंगाई झाली आहे. प्रशासनाने घाईगर्दीने चार तासांत रस्ता दुरुस्तीचे काम केले आहे. मात्र हे संपूर्ण काम योग्य रीत्या पूर्ण झाले पाहिजे, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 3:20 am

Web Title: potholes pmc road repair
टॅग : Pmc,Potholes
Next Stories
1 नायडू व कमला नेहरु रुग्णालयात ऑगस्टअखेर डेंग्यू चाचण्या सुरू होणे अपेक्षित
2 पिंपरी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक संख्येत घसरण सुरूच
3 पुणे- लोणावळा लोहमार्ग तिहेरीकरण प्रकल्पाला वेग
Just Now!
X