भरारी पथकांच्या माध्यमातून वीजचोरांना पकडण्याची जोरदार मोहीम राबविण्यात येत असली, तरी सर्वाधिक वीजचोरी व गळती असलेल्या विभागात इतर विभागांच्या तुलनेत कमी वीजचोर पकडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘महावितरण’ने मे महिन्यात राबविलेल्या मोठय़ा मोहिमेतही ही बाब स्पष्ट झाली आहे. दहा टक्क्य़ांहून कमी गळती असलेल्या पुणे व कल्याणसारख्या परिमंडलात मोठय़ा प्रमाणावर वीजचोर पकडले जात असताना वीस टक्क्य़ांहून अधिक गळती असलेल्या नांदेड, लातूर, जळगावबरोबच नव्याने परिमंडल झालेल्या उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांच्या बारामतीतही वीजचोर पकडल्याची संख्या कमी आहे.
‘महावितरण’ च्या घोषणेनुसार दोन वर्षांपूर्वीत राज्य वीजकपातमुक्त झाले आहे. ज्या विभागातून योग्य प्रमाणात वीजबिलांची वसुली होत नाही, त्याच विभागात वीजकपात केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.  वीजबिलांची वसुली न होणे म्हणजे त्या विभागात मोठय़ा प्रमाणावर वीजचोरी व गळती होत असल्याचे स्पष्ट आहे. बडय़ा वीजचोरांना पकडून विजेची ही गळती कमी होऊ शकते. पुणे व कल्याण विभागात हे शक्य झाले आहे. मात्र इतर काही विभागात वीजचोरांवरील कारवाईला वेग नाही. बडे वीजचोर मोकाट असल्याने त्या भागातील वीजगळती कमी होत नाही. पर्यायाने प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांनाही वीजकपातीचा झटका सहन करावा लागतो आहे.
‘महावितरण’ च्या वतीने मे महिन्यात वीजचोरांविरुद्ध राज्यभर करण्यात आलेल्या मोठय़ा कारवाईमध्ये १,००७ वीजचोऱ्या उघड झाल्या. १६ लाख २५ हजार ८४० युनिटची तब्बल १० कोटी २८ लाख ५८ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. त्यात राज्यभर १,५६६ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. झालेली कारवाई योग्य असली, तरी विभागवार गळती व त्यातुलनेत पकडण्यात आलेल्या वीजचोरांची संख्या पाहता. मोठय़ा प्रमाणावर वीजचोरी व गळती असलेल्या परिमंडलात वीजचोर मोकाट असल्याचे दिसते आहे.
राज्यात सर्वात कमी वीजगळती (९.६१ टक्के) असलेल्या पुणे व कल्याण (९.९८ टक्के) परिमंडलात या मोहिमेत अनुक्रमे ११० व २४४ वीजचोर पकडले जात असताना सर्वाधिक वीजकळती असलेल्या नांदेड (२२.८२ टक्के) व लातूर (२२.०० टक्के) परिमंडलात अनुक्रमे ८५ व ११० वीजचोर सापडले आहेत. जळगाव व औरंगाबादमध्येही तिच स्थिती आहे. तेथे अनुक्रमे २१.३३ व १८. ७१ टक्के वीजगळती असताना ६२ व ४६ वीजचोरच हाती लागले आहेत. उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री असलेल्या अजित पवार यांच्या बारामतीमध्ये १५.३८ टक्के गळती आहे. तेथेही सत्तरच वीजचोर सापडले आहेत.

 
परिमंडलाचे नाव—-वीजगळती टक्केवारी—-मे मधील कारवाईतील वीजचोर
नांदेड————२२.८२————-८५
लातूर————२२.००————-११०
जळगाव———-२१.३३————–६२
औरंगाबाद———१८.७१————-४६
अमरावती———१८.३३————-१६७
कोकण———–१६.७७————-७१
नाशिक———–१५.५१————-११८
बारामती———-१५.३८————–७०
कोल्हापूर———१४.२९————–७९
नागपूर शहर——-१३.३४————–२५
भांडूप———–१२.८२————-१९३
नागपूर ग्रामीण——१०.८१————-१८६
कल्याण———-९.९८————–२२४
पुणे————-९.६१————–११०