‘आयसर पुणे’च्या वैज्ञानिकांचे संशोधन

पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) वैज्ञानिकांना गोमूत्रापासून विद्युतघटाची (बॅटरी) निर्मिती करण्यात यश आले आहे. ३०-३५ मिली गोमूत्रापासून १.५ व्होल्ट वीज निर्मिती होऊ शकत असल्याचे या संशोधनातून दिसून झाले आहे.

आयसर, पुणेमधील डॉ. मोहम्मद मुस्तफा यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मृत्युंजयचारी, मनू गौतम, सौमदीप सूर आणि अलागर राजा यांनी हे संशोधन केले आहे. गोमूत्रापासून विद्युतघटाची निर्मिती करताना आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञानाचा आधार घेण्यात आला. गोमूत्राचा आयुर्वेदिक उपचारात वापर प्रामुख्याने केला जातो. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जैवविविधता यात गाईचे स्थान मोठे आहे. त्यामुळेच गाईला सांस्कृतिक मूल्य मोठे आहे. चरकसंहिता, सुश्रुत संहिता, वाग्भटांचे ग्रंथ यात आठ प्रकारच्या प्राणी मूत्रांचा उल्लेख केला आहे, ज्यांचा वापर औषध म्हणून केला जातो. त्यात गोमूत्राचाही समावेश आहे. गोमूत्रात नायट्रोजन, फॉस्फेट यांचा प्रामुख्याने समावेश असतो. या शिवाय सल्फर (गंधक), सोडियम, मँंगेनीज, लोह, सिलिकॉन, क्लोरिन, मॅग्नेशियम, मॅलेइक, सायट्रिक, टारटारिक आम्ल, कॅल्शियम क्षार, खनिजे, लॅक्टोज, वितंचके (एन्झाइम), क्रिएटिनाइन हे रासायनिक घटकही त्यात असतात. त्यामुळे त्याचा वापर जैव इंधन म्हणून होऊ शकतो, अशी माहिती डॉ. मुस्तफा यांनी दिली.

गोमूत्रावर प्रयोग करून नवीन विद्युतघट तयार केला आहे. त्या द्वारे वीज निर्मिती होते. यात हायड्रोजन व मॅग्नेशियमच्या फॉस्फेटचा घटक अशी दोन उत्पादने तयार होतात. हा विद्युतघट (बॅटरी) वापरण्यास सुलभ असून त्यातून १.५ व्होल्ट वीज ३०-३५ मिली गोमूत्रापासून तयार करता येते. त्यात तासाला ४० मिली हायड्रोजन, ०.८ ग्रॅम मॅग्नेशियमचे फॉस्फेट तयार होते. या संशोधनात गोमूत्राचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. यात विजेसह हायड्रोजनसारखे इंधन आणि मॅग्नेशियम फॉस्फेटसारखे खतही उप उत्पादन म्हणून तयार होते. हे तंत्र प्रायोगिक पातळीवर यशस्वी झाले आहे. एक गाय रोज १३ लिटर गोमूत्र देते. त्यापासून वीज निर्मिती करताना तासाला १५ लिटर हायड्रोजन आणि ३०० ग्रॅम खत तयार होते, तर ११ व्ॉट वीज निर्मिती करता येते, अशी माहिती डॉ. मुस्तफा यांनी दिली.

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे भेटीदरम्यान आयसरला भेट देऊन या प्रयोगाची माहिती घेतली होती. गोमूत्रापासून विद्युतघट तयार करण्यात त्यांनी स्वारस्य दाखवले आहे. आता व्यावसायिक विद्युत वाहनांसाठी त्याचा वापर करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. मात्र, या संशोधनावर सध्या आणखी प्रयोग करण्यात येत असून, पुढील दोन ते तीन वर्षांत हा विद्युतघट उपलब्ध होऊ शकेल.

– डॉ. मोहम्मद मुस्तफा, आयसर