स्वरभास्कर पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी जाहीर केल्यानंतर आता महापालिकेला जाग आली आहे. पुरस्कार समारंभासाठी आपल्या सोयीचा दिनांक कळवावा किंवा आम्ही घरी येऊन हा पुरस्कार आपल्याला सन्मानपूर्वक देऊ इच्छितो त्याचा स्वीकार करावा, अशी विनंती महापालिकेने अत्रे यांना केली आहे. झालेल्या प्रकाराबद्दल महापालिकेने दिलगिरीही व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्वरभास्कर पुरस्कारासाठी गेल्या वर्षी प्रभा अत्रे यांची निवड करण्यात आली होती. मात्र वर्षभरात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही. हा पुरस्कार प्रदान समारंभ चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी प्रभा अत्रे यांनी काही सूचना केल्या होत्या. मात्र त्याबाबत असमर्थता दाखवून त्यांच्या अटी आम्हाला स्वीकारता येणार नाहीत असा दावा महापौरांनी केला होता. तसेच पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतही महापालिकेतर्फे असमर्थता व्यक्त करण्यात आली होती.
महापालिकेने पुरस्काराबद्दल ही भूमिका घेतल्यानंतर अत्रे यांनी प्रथमच त्यांची बाजू मांडली. पुरस्काराच्या विषयावरून महापालिकेने माझी खूपच मोठी बदनामी केली आणि पुरस्कार समारंभ कसा तरी उरकण्याची मानसिकता दिसून आली. त्यामुळे जे घडले त्या पाश्र्वभूमीवर मी हा पुरस्कार नाकारत आहे असे पत्र अत्रे यांनी गेल्या आठवडय़ात महापौरांना दिले होते. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पुणे महानगरपालिका आणि मी अशा दोघांच्या दृष्टीने दर्जेदार व्हावा या हेतूने पुढाकार घेऊन मी काही सूचना केल्या होत्या. त्या अटी नव्हत्या आणि तसा माझा हट्टही नव्हता. केवळ सहकार्याची भावना होती. ही गोष्ट महापालिकेला मान्य नव्हती तर त्याचवेळी महापालिकेने मला ते कळवायला हवे होते, असे अत्रे यांनी महापालिकेला पत्राद्वारे कळवले होते.
प्रभा अत्रे यांनी पुरस्कार नाकारल्यानंतर सांस्कृतिक क्षेत्रातून महापालिकेच्या अनास्थेबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. ‘लोकसत्ता’नेही ‘संस्कृतीचीच लाज’ या शीर्षकाने ‘लोकजागर’ या सदरातून महापालिकेच्या मानसिकतेवर मंगळवारी टीका केली. ज्या महाराष्ट्रात पुणे हे संगीतासाठी सातत्याने अग्रेसर राहिले, त्या पुण्यातच असे घडावे हे लाजिरवाणे आहे, असे या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.
या सर्व घटनांच्या पाश्र्वभूमीवर महापौरांनी अत्रे यांना पत्र लिहिले असून पुरस्कार समारंभासाठी दिनांक व वेळ कळवावी अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे. झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून महापालिकेचा पुरस्कार आपण स्वीकारावा तसेच आपल्या सूचनेनुसार आपल्या घरी येऊन देखील सन्मानपूर्वक हा पुरस्कार देण्याची तयारी आहे, असे महापौरांनी कळवले आहे.