‘संत ज्ञानेश्वर’, ‘कुंकू’, ‘शेजारी’, ‘पडोसी’, ‘संत तुकाराम’, ‘अयोध्येचा राजा’, ‘सैरंध्री’, ‘सिंहगड’, ‘अमृतमंथन’, ‘धर्मात्मा’ अशा अभिजात चित्रपटांच्या मालिकेने भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सुवर्णयुगाची निर्मिती केलेल्या ‘प्रभात फिल्म कंपनी’च्या स्थापनेला शनिवारी (१ जून) ९० वर्षे पूर्ण होत आहेत. प्रभात स्टुडिओच्या जागेवर गेल्या अर्धशतकापासून कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमध्ये (एफटीआयआय) या निमित्ताने छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार असून संस्थेतील प्रभात संग्रहालय सकाळी दहा ते बारा या वेळात नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविल्या गेलेल्या ‘प्रभात पर्व’ची सुरुवात कोल्हापूर येथे पार्वतीबाई दामले यांनी १ जून १९२९ रोजी मंगल कलश ठेवून केली. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’मध्ये बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेतलेल्या विष्णूपंत दामलेमामा, एस. फत्तेलाल, व्ही. शांताराम आणि धायबर यांना स्वत:ची चित्रपटनिर्मिती कंपनी सुरू करण्याचा ध्यास होता. कोल्हापुरातील सुप्रसिद्ध सराफ सीतारामपंत कुलकर्णी यांनी दामले यांना भांडवल दिले, अशी माहिती अनिल दामले यांनी दिली.

प्रभातच्या निर्मात्यांनी १९२९ ते १९३२ या काळात सहा मूकपटांची निर्मिती केली. १९३२ मध्ये ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाची निर्मिती केली.भारतीय चित्रपटसृष्टीतला हा सर्वात जुना बोलपट सुस्थितीत जतन केला गेला आहे. १९३४ साली प्रभातचे पुण्यात स्थलांतर झाले. दामलेमामांच्या देखरेखेखाली प्रभातची वास्तू उभी राहिली. त्या काळात आशियातील सर्वात मोठा स्टुडिओ अशी ‘प्रभात’ची ख्याती होती. १९३३ मध्ये ‘प्रभात’ने ‘सैरंध्री’ हा भारतातील पहिला रंगीत बोलपट निर्माण केला. १९३४ ते १९५७ या ‘प्रभात’चा पुण्यातील दोन तपांच्या कालखंडात निर्मिती झालेल्या २६ बोलपटांपैकी नऊ बोलपटांनी इतिहास घडवला.

१९५७ साली ‘प्रभात’च्या अस्तानंतर सर्व चित्रपटांचे हक्कही विकले गेले. १९६९ मध्ये अनंतराव दामले ह्यंनी प्रभातच्या सर्व चित्रपटांचे हक्क परत मिळवले. त्यानंतर गावोगाव चित्रपटांचे आठवडय़ाच्या आठवडे प्रदर्शन  होऊ  लागले. बदलत्या काळानुरूप व्हिडिओ, डीव्हीडी दामले कुटुंबीयांनी बनवल्या. ‘प्रभात’ काळातील अनेक दुर्मीळ छायाचित्रे, कागदपत्रे, चित्रपट या सर्व ठेव्याचं डिजिटायझेशन केले आहे. प्रभात फिल्म कंपनीच्या महिम्यामुळे देशभरात अनेक गावांमध्ये प्रभात चित्रपटगृहे अस्तित्वात आली, असे दामले यांनी सांगितले.

‘प्रभात’च्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा

* १९३२ : ‘अयोध्येचा राजा’ मराठीतील पहिला बोलपट

*  १९३३ : ‘सैरंध्री’ हा पहिला रंगीत चित्रपट

* १९३५ : ‘अमृतमंथन’ चित्रपटाचे व्हेनिस चित्रपट महोत्सवात प्रदर्शन

*  ‘धर्मात्मा’ चित्रपटात बालगंधर्व यांनी साकारली संत एकनाथांची भूमिका

* १९३८ : ‘दुनिया न माने’चे व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शन

* १९४१ : अमेरिकेत प्रदर्शित होणारा ‘संत ज्ञानेश्वर’ पहिला भारतीय चित्रपट

* १९४६ : ‘हम एक हैं’द्वारे देव आनंद यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण