चित्रपटसृष्टीतील सात दशकांच्या देदीप्यमान कारकीर्दीला प्रभात जीवनगौरव पुरस्काराचे कोंदण लाभले आणि हा सन्मान होत असताना बालगंधर्व रंगमंदिरातील रसिकांनी उभे राहून टाळय़ांचा कडकडाट करीत ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांना अभिवादन केले.
‘प्रभात फिल्म कंपनी’च्या स्थापनादिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते सुलोचनादीदी यांना प्रभात जीवनगौरव पुरस्काराने रविवारी गौरविण्यात आले. प्रभातच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेले स्थिर छायाचित्रकार बबनराव वाळवेकर आणि कपडेपट सांभाळणारे दत्तोबा भाडळे या बुजुर्ग कलाकारांना प्रभातचे शिलेदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. काळाच्या ओघात अस्तित्वात नसलेले पुण्यातील आर्यन चित्र मंदिर, नाशिक येथील विजयानंद चित्रपटगृह आणि मुंबई येथील प्लाझा चित्रपटगृह या चित्रपटगृहचालकांचा सन्मान करण्यात आला. प्रभातचे विवेक दामले या वेळी उपस्थित होते. विक्रम गोखले यांनी सुलोचनादीदी यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फॅन्ड्री’ चित्रपटाला प्रभात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘प्रभात’शी असलेल्या ऋणानुबंधाच्या गाठी सुलोचनादीदी यांनी आपल्या छोटेखानी मनोगतातून उलगडल्या. बालपणी खेडेगावात असताना तंबूमध्ये पाहिलेला ‘सिंहगड’ हा चित्रपट.. चित्रपटात काम करण्यासाठी पुण्यात आल्यावर राजाभाऊ परांजपे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर यांच्यासमवेत केलेल्या ‘जिवाचा सखा’ चित्रपटाचे प्रभात फिल्म कंपनीमध्ये झालेले चित्रीकरण.. प्रभातच्या अखेरच्या काळात राजा बारगीर यांच्या ‘गजगौरी’ चित्रपटामध्ये केलेली नायिकेची भूमिका.. अशा कारकीर्दीतील विविध टप्प्यांवर प्रभातशी आलेल्या संबंधांवर सुलोचनादीदी यांनी प्रकाश टाकला. वडील फौजदार होते. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी तिकीट काढण्याचा प्रश्नच आला नाही. प्रभातचे चित्रपट पाहताना मीही त्याच भारावलेल्या काळाचा भाग बनले. कारकीर्दीमध्ये आजवर अनेक सन्मान मिळाले, पण जिव्हाळय़ाच्या माणसांनी दिलेला प्रभात पुरस्कार मला मोलाचा वाटतो, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
प्रभात चित्रपट पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे-
सवरेत्कृष्ट चित्रपट- यलो, दिग्दर्शक- महेश लिमये (यलो), पटकथा- अभिजित पानसे (रेगे), कथा- अजित दळवी आणि प्रशांत दळवी (आजचा दिवस माझा), अभिनेता- डॉ. मोहन आगाशे (अस्तू), अभिनेत्री- इरावती हर्षे (अस्तू), खलभूमिका- जितेंद्र जोशी (दुनियादारी), बालकलाकार (विभागून)- सोमनाथ अवघडे (फॅन्ड्री) आणि गौरी गाडगीळ (यलो), सहायक अभिनेत्री- अमृता सुभाष (अस्तू), हृषीकेश जोशी (आजचा दिवस माझा).