चित्रपटसृष्टीच्या आठ दशकांचा मूक साक्षीदार आणि मराठी चित्रपटांचे माहेरघर असलेल्या ‘प्रभात’ चित्रपटगृहाचा दुसरा डाव (सेकंड इनिंग) महापालिकेच्या दोन विभागांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’अभावी लांबणीवर पडला आहे. ही प्रमाणपत्रे न मिळाल्यामुळे चित्रपटगृह सुरू करण्यासाठीचा १ मे हा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त चुकला. मात्र, चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने ‘किबे लक्ष्मी थिएटर’ हे पूर्वीचेच नाव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वास्तूवर आता ‘किबे लक्ष्मी थिएटर’ असा फलक झळकताना दिसत आहे.
इंदूर येथील संस्थानिक रामचंद्र किबे यांच्या मालकीची ही वास्तू. पूर्वी नाटकाचे रंगमंदिर असलेल्या या वास्तूमध्ये पडदा लावून त्याचे चित्रपटगृहामध्ये रूपांतर करण्यात आले होते. किबे यांच्या मातोश्री लक्ष्मी यांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशातून किबे लक्ष्मी थिएटर असे नामकरण करण्यात आले होते. प्रभात फिल्म कंपनीच्या भागीदारांनी हे चित्रपटगृह चालविण्यासाठी घेतले आणि प्रभात फिल्म कंपनीवरूनच या चित्रपटगृहाचे प्रभात हे नाव ठेवण्यात आले. या भागीदारांपैकी एक असलेले विष्णुपंत दामले यांचे नातू विवेक दामले यांच्याकडे डिसेंबपर्यंत चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. कराराची मुदत संपल्यामुळे १० जानेवारी सरदार किबे यांचे नातू अजय किबे यांच्याकडे चित्रपटगृहाची मालकी हस्तांतरित झाली. मात्र, त्यापूर्वी काही कामांचा निपटारा करण्यासाठी २५ डिसेंबर हा प्रभात चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्याचा अखेरचा दिवस निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार २६ डिसेंबरपासून हे चित्रपटगृह बंद ठेवण्यात आले होते.
अप्पा बळवंत चौकातील १४ हजार स्क्वेअर फुटांच्या वास्तूमध्ये असलेले चित्रपटगृह कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करणार नाही, असे अजय किबे यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यानुसार आता येथे चित्रपटगृह सुरू होणार असले, तरी माझ्या पणजीच्या नावाने असलेल्या या चित्रपटगृहाचे ‘किबे लक्ष्मी थिएटर’ हे मूळ नाव ठेवण्याचे आम्ही ठरविले आहे, असेही त्यांनी सांगितले. चित्रपटगृहातील बाल्कनी आणि अप्पर स्टॉल येथील खुच्र्या बदलण्यात आल्या असून गालिचाही (कारपेट) नव्याने टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चित्रपटगृहाचा पडदा बदलण्यात आला आहे. स्वच्छतागृहामध्ये सुधारणा करून घेतल्या आहेत. या चित्रपटगृहामध्ये मराठी चित्रपटांना प्राधान्य देण्याचेच धोरण कायम ठेवण्यात येणार असल्याचे अजय किबे यांनी सांगितले. चित्रपटगृहाच्या मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, महापालिकेच्या दोन विभागांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळण्याचे अद्याप बाकी आहे. ही प्रमाणपत्रे हाती आल्याखेरीज पोलीस आयुक्तांचा परवाना घेता येत नाही. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून हे चित्रपटगृह सुरू करण्याचा आमचा मानस होता. मात्र, कागदपत्रांची पूर्तता झाल्याखेरीज सुरू करता येत नाही ही आमची अडचण असल्याचेही अजय किबे यांनी सांगितले.