‘शब्द निवडीतील सहजता, शब्द मांडणीतील अनौपचारिकता, कायमस्वरूपी सतर्कता आणि किंचित उत्स्फूर्तता यांच्या जोरावर वक्तृत्व कला आत्मसात करता येते. केवळ गायनाचाच नाही तर गद्य शब्दांचाही रियाज करावा लागतो,’ अशा शब्दांत प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी वक्तृत्व कलेचे मर्म सोमवारी उलगडले. निमित्त होते ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीचे. या फेरीतून निखिल कुलकर्णी या विद्यार्थ्यांने महाअंतिम फेरी गाठली आहे.
‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीतील विजेत्यांना गाडगीळ यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’, ‘इंडियन ऑइल’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करीअर डेव्हलपमेंट’ (आयसीडी) यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत असून ‘युनिक अ‍ॅकॅडमी’ आणि ‘स्टडी सर्कल’ या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर आहेत. प्राचार्या डॉ. बीना इनामदार आणि प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले. जनता बँकेचे कार्याध्यक्ष अरिवद खळदकर, युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम पाटील, मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेसचे डॉ. नरसिंह मांडके, ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, जनता बँकेचे उप महाव्यवस्थापक सुधीर कामत, विपणन विभागाचे प्रमुख राधाकृष्ण लिमये हे युवा वक्तयांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
‘वक्तृत्व ही कला आत्मसात केली म्हणजे केवळ स्पर्धापुरतेच नाही तर जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये यश संपादन करता येईल. स्पर्धेतील वक्तयांची मनोगते ऐकताना मला माझ्या महाविद्यालयीन काळातील स्पर्धाची आठवण झाली. दिसेल ते पुस्तक आणि माणूस वाचण्याची सवय असल्याने त्या वेळच्या स्पर्धामध्ये अभ्यासपूर्वक विचार मांडले जात असत.’ अशा आठवणी गाडगीळ यांनी सांगितल्या.
बीना इनामदार म्हणाल्या, पाठांतर चोख केले हे जाणवू न देणे ही वक्तृत्व कलेची खासियत आहे. स्वत:वर, निवडलेल्या विषयावर प्रेम आणि आस्था ठेवा. प्रभावी बोलणे जमले तर तुमचे कोणतेही काम अडणार नाही.
आनंद देशमुख म्हणाले, भावनांनी ओथंबलेले शब्द अर्थवाही असतात. केवळ माहिती गोळा करून पाठांतरावर भर देण्यापेक्षा रोजच्या वापरातील शब्द आपल्या वक्तृत्वामध्ये वापरावेत. या वेळी मुकुंद संगोराम यांनी प्रसारमाध्यमांच्या कार्यशैलीबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
 प्रथम : निखिल कुलकर्णी (संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
द्वितीय : चित्ततोष खांडेकर (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ)
तृतीय : अभिषेक घैसास (स. प. महाविद्यालय)
उत्तेजनार्थ : संस्कृती गाठेकर, शुभम श्रोत्री  (पुणे विद्यार्थिगृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय)