स्टेशनरी कटलरी अँड जनरल र्मचट्स असोसिएशनच्या व्यापारी एकता दिनाला वितरण
स्टेशनरी कटलरी अँड जनरल र्मचट्स असोसिएशनतर्फे दरवर्षी व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले जाते. यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार कॉटन किंगचे प्रदीप मराठे यांना प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या हस्ते दिला जाणार आहे. हा कार्यक्रम सोमवारी (६ जून) सायंकाळी साडेपाच वाजता एस. एम. जोशी सभागृहात होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजेश गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्कार वितरण समारंभाला क्रिसिलीस ग्रुपचे अध्यक्ष मनीष गुप्ता आणि एफडीआयचे सहआयुक्त शशिकांत केकरे उपस्थित राहणार आहेत. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकार परिषदेत मदनसिंह रजपूत, शिरीष बोधनी, दिलीप कुंभोजकर, अरिवद पटवर्धन, नितीन पंडित, सुरेश नेऊरगावकर, प्रफुल्ल सुरपुरिया, गणपत जैन, रवींद्र रणधीर, सचिन जोशी, अनिल प्रभुणे आदी उपस्थित होते.
राजेश गांधी म्हणाले, व्यापारातून समृद्धी साधताना कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या व्यापाऱ्यांचा गौरव संघटनेतर्फे पुरस्कार देऊन केला जातो. पुरस्काराचे यंदा विसावे वर्ष आहे. या वर्षीचा उत्कृष्ट दुकानदार पुरस्कार सिटी मेगा स्टोअर्सचे अभय ललवाणी, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार पावगी आणि पावगी कंपनीचे विनायक पावगी, फिनिक्स पुरस्कार डी. प्रमोद मॅन्यु. कंपनीचे अनिल व प्रमोद दुशी आणि साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार काणे फुड्सच्या मंजिरी काणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ असे आहे.
शिरीष बोधनी म्हणाले, यापूर्वी ज्येष्ठ उद्योजक डी. एस. कुलकर्णी, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका, सुदर्शन स्टेशनरीचे करमचंदानी, लक्ष्मीनारायण चिवडा कंपनीचे बाबूशेठ डाटा, जवाहर टेलडिंग कंपनीचे चकोर गांधी आदींना व्यापारभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उद्योगातील वाढत्या प्रगतीचा आलेख पाहून पुरस्कारार्थीची निवड समितीतर्फे केली जाते.