News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : ‘प्राज्ञपाठशाळे’ला पाठबळाची गरज

अभिजात साहित्यनिर्मितीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

संग्रहित छायाचित्र

राज्यातच नव्हे, तर देशातील अनेक विद्यापीठांमध्ये पोहोचलेल्या आणि शतकी वाटचाल पूर्ण केलेल्या वाई येथील ‘प्राज्ञपाठशाळा मंडळा’ने अनेक नवी उद्दिष्टे ठेवली आहेत. अभिजात साहित्यनिर्मितीसाठी संस्थेस सध्या लोकाश्रयावर अवलंबून राहावे लागत आहे. धर्मकोश खंड प्रकाशित करण्याबरोबरच संस्थेचे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम रखडले आहेत. ते पूर्णत्वास नेण्यासाठी संस्थेला समाजाकडून आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.

‘प्राज्ञपाठशाळा मंडळा’च्या ग्रंथालयात २० हजारांहून अधिक दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह आहे. त्याचप्रमाणे धर्मकोशातील अनेक नोंदींच्या पूर्ततेसाठी संस्थेकडे १२ हजारांहून अधिक जुन्या हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह आहे. दुर्मीळ साहित्याचे जतन करताना संस्थेची सतत आर्थिक ओढाताण होते. तरीही समाजातील अनेकांचे सहकार्य मिळेल, या अपेक्षेने संस्थेचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.

‘प्राज्ञपाठशाळा मंडळ’ ही संस्था पूर्णपणे लोकाश्रयावर चालते. संस्थेस कोणतेही शासकीय अनुदान नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी या संस्थेला आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. ‘प्राज्ञपाठशाळा मंडळ’ या संस्थेस प्राप्तिकर खात्याची करसवलत (८० जी) प्राप्त आहे.

‘प्राज्ञपाठशाळे’ने धर्मकोश प्रकाशित केला आहे. त्याची कीर्ती जगभरातील विद्वानांपर्यंत पोहोचली आहे. अनेक परदेशी विद्यापीठांकडूनही धर्मकोशाच्या भागांना मागणी आहे. धर्मकोश प्रकल्पात सध्या वाचनसंग्रह, शास्त्रार्थ, पोथ्यांचे वाचन या सर्वाचा वापर करून ‘धर्मकोश खंड’ तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक खंडामध्ये रॉयल साइजची अंदाजे एक हजार पृष्ठे समाविष्ट असतात. लेखनाचे टंकलेखन (टायपिंग) करणे, विद्वान शास्त्रींची नियुक्ती करणे, खंडाची छपाई करणे यासाठी प्रत्येक खंडास अंदाजे १२ लाख रुपये खर्च येतो. परंतु आर्थिक अडचणीमुळे धर्मकोश खंड प्रकाशित करण्यास विलंब होत आहे.

याशिवाय, संस्थेने अनेक उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. धर्मकोश प्रकल्पाच्या पूर्ततेबरोबरच ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी- सर्वधर्म अध्ययन केंद्र’ आणि अनेक विषयांवरील शैक्षणिक शिबिरे असे उपक्रम राबवण्यासाठी संस्थेने नियोजन केले आहे.

आतापर्यंत झालेल्या कांडांचे काम

१. व्यवहारकाण्डम्- ३ भाग

२. उपनिषदकाण्डम्- ४ भाग

३. संस्कारकाण्डम्- ६ भाग

४. राजनीतीकाण्डम्- ६ भाग

५. वर्णाश्रमधर्मकाण्डम्- ७ भाग, ८ व्या भागाचे काम सुरू

पुढील कांडांचे काम

१. वर्णाश्रमधर्मकाण्डम्- २ भाग

२. शुद्धीश्राद्धकाण्डम्- ४ भाग अंदाजे

३. प्रायश्चित्तकाण्डम्- ४ भाग अंदाजे

४. शान्तिकाण्डम्- ४ भाग अंदाजे

५. पुराणगमधर्मकाण्डम् – ३ भाग अंदाजे

६. समयकाण्डम्- २ भाग अंदाजे

७. मोक्षकाण्डम्- १ भाग अंदाजे

मदतनिधीसाठी ऑनलाइन सुविधा

या उपक्रमातील संस्थांसाठी ऑनलाइन मदतनिधी जमा करण्याची सुविधा कॉसमॉस बॅंकेच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देश-विदेशातील दानशूरांना त्याचा लाभ घेता येईल. याबाबतचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:21 am

Web Title: pradnya pathshala wai need for support abn 97
Next Stories
1 कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात पावसाचा जोर
2 राज्य शासनाच्या रोजगार मेळाव्यांकडे बेरोजगारांची पाठ
3 पृथ्वीच्या सर्वात जवळून गेलेल्या लघुग्रहाचा मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून शोध
Just Now!
X