प्रगत राष्ट्रांमध्ये बॅलेट पेपर द्वारेच निवडणुका होतात. ईव्हीएम मशीन या सदोषही असू शकतात तेव्हा भारतच ईव्हीएम मशीनचा हट्ट का धरून बसला आहे? असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  निवडणुकादरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमा प्रसंगी केला. तसेच निवडणूक आयोगाने यामध्ये लक्ष देण्याची गरज असून प्रभागपद्धतीने झालेल्या निवडणुका घटनाबाह्य असल्याचे सांगत या निवडणुका रद्द कराव्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ईव्हीएम मशीनमध्ये गैरप्रकार कसा केला जातो यावर याचिका दाखल केली होती. २०१३ साली सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम मध्ये गैरप्रकार करता येणे शक्य असल्याचा निकाल दिला होता. त्याचबरोबर निवडणूक आयोगाला त्याची योग्य ती अंमलबजावणी करण्याचा आदेशही दिला होता. मात्र, निवडणूकीमध्ये याची अंमलबजावणी केली गेली नाही. ते पुढे म्हणाले की, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर करता येतो. मात्र, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीनचा गैरप्रकार होत असल्याचे समोर आले असतानाही निवडणूक आयोग त्यांच्या बाजूने का आहे हे समजत नाही, असा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला.