News Flash

ब्रॅण्ड पुणे : उबदार कपडय़ांचे ‘फॅमिली शॉप’!

वसंतराव मनोरकर हे आधी स्टेशनरीचा व्यवसाय करत. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय नव्हता.

प्रकाश डिपार्टमेंटल स्टोअर्स

तयार कपडे ही संकल्पना पुणेकरांसाठी नवीन असताना उभी राहिलेली आणि काळाच्या ओघात स्वत:ला बदलत टिकून राहिलेली दुकाने मोजकीच. वसंत टॉकिज समोरील ७५ वर्षे जुने ‘प्रकाश डिपार्टमेंटल स्टोअर’ हे त्यातलेच एक. लहान मुले, महिला आणि पुरुषांच्या कपडय़ांबरोबरच वर्षभर उबदार कपडे विकणारे एक ‘आद्य फॅमिली शॉप’ म्हणून त्यांनी स्थान मिळवले आहे.

ते साल होते १९४५. कपडे शिवायचे ते शक्यतो घरातच किंवा घरात नाही शिवले, तर वर्षांनुवर्षे कुटुंबाचे कपडे शिवणाऱ्या ओळखीच्या शिंप्याच्या दुकानातून शिवून घ्यायचे. दुकानात जाऊन आपल्या मापानुसार तयारच कपडे खरेदी करण्याची संकल्पना फारशी रुजली नव्हती. पुण्यातील वसंतराव मनोरकर यांनी त्या काळी वसंत टॉकिजसमोर एक छोटेसे दहा-बाय-दहा जागेतले तयार कपडय़ांचे दुकान सुरू केले. पुण्यात ‘रेडिमेड’ कपडे हळूहळू लोकप्रिय होऊ लागले आणि वसंतरावांचा व्यवसाय वाढत गेला. या दुकानाचे पुढे ‘डिपार्टमेंटल स्टोअर’मध्ये रूपांतर झाले. नेहमीच्या कपडय़ांबरोबरच बारा महिने लोकरीचे उबदार कपडे विकणारे एक ‘आद्य फॅमिली शॉप’ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. हेच ते ‘प्रकाश डिपार्टमेंटल स्टोअर’.

वसंतराव मनोरकर हे आधी स्टेशनरीचा व्यवसाय करत. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय नव्हता. रेडिमेड कपडय़ांचा व्यवसायही चांगला फायदेशीर ठरू शकेल असे त्यांच्या मनाने घेतले आणि तयार कपडय़ांची अगदी मोजकीच दुकाने पुण्यात असताना त्यांनी स्वत:चे दुकान सुरू केले. मुंबईहून तयार कपडे आणून ते येथे विकत. सामान्य ग्राहकाला हे कपडे विकत घेण्यासाठी वळवण्यात आणि ते लोकप्रिय करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, असे त्यांच्या कन्या हेमलता पेठकर सांगतात. अगदी सुरुवातीला केवळ लहान मुलांच्या कपडय़ांपासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर पुरुषांचे आणि महिलांचे कपडेही त्यांच्या दुकानात मिळू लागले. हळूहळू मनोरकरांच्या व्यवसायाला प्रतिसाद मिळू लागला आणि १९६८ मध्ये त्यांनी ‘डिपार्टमेंटल स्टोअर’च्या रूपात दुकान सुरू केले. सहकुटुंब जाऊन रेडिमेड कपडे खरेदीची सोय अशी त्यांची ओळख तयार होऊ लागली.

तयार कपडय़ांच्या व्यवसायात उत्तम जम बसल्यानंतर १९७५ च्या सुमारास लोकरीच्या कपडय़ांचीही विक्री सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. हे कपडे ते लुधियानाहून आणत. त्या वेळी लोकरीच्या कपडय़ांचीही चार-पाच दुकानेच पुण्यात होती. स्पर्धा वाढत जाते, तसा प्रत्येक व्यावसायिक आपले काहीतरी वैशिष्टय़ तयार करतो. वाजवी दर हे ‘प्रकाश’चे कायम वैशिष्टय़ राहिले, असे हेमलता पेठकर सांगतात. उबदार कपडय़ांची विक्री सुरू केल्यानंतरही त्यांनी नेहमीचे तयार कपडे विकणे बंद केले नाही. बारा महिने लोकरीचे कपडे मिळणारे दुकान ही त्यांची नवी खासियत झाली.

वसंतरावांच्या निधनानंतर- १९९७ नंतर हेमलता पेठकर, त्यांचे पती आणि मुलगा अमोल पेठकर यांनी दुकानात लक्ष घालण्यास सुरुवात केली. सध्या हेमलता पेठकर व अमोल पेठकर हे दुकानाचे काम सांभाळतात. वसंत टॉकिजजवळचे मोठे दुकान आणि त्याच्या समोरच्या बाजूस केवळ पुरुषांच्या रेडिमेड कपडय़ांचे स्वतंत्र दुकान असे ‘प्रकाश’चे सध्याचे स्वरूप आहे. शिवाय मगरपट्टा येथे ‘अल्टिटय़ूड’ या नावाने त्यांनी आणखी एक दुकान सुरू केले आहे.

आजच्या मॉल आणि ‘ऑनलाइन’ खरेदीच्या जमान्यात प्रत्यक्ष खरेदीची दुकाने टिकून असली, तरी एकाच छताखाली आबालवृद्धांचे कपडे आणि वर्षभर लोकरीचेही कपडे विकणारी दुकाने कमी आहेत. गेल्या ७५ वर्षांत ‘प्रकाश’ काळानुसार बदलत राहिले. नवनवीन ‘फॅशन’चे उबदार कपडे त्यांनी आणले, इतकेच नव्हे, तर आता तेही ऑनलाइन विक्रीत उतरत आहेत. या सर्व बदलांमध्ये त्यांची ‘फॅमिली शॉप’ ही मूळची प्रतिमा त्यांनी पुसू दिली नाही. ही ओळखच त्यांना इतर अनेकांपेक्षा वेगळा ‘ब्रँड’ बनवते.

संपदा सोवनी sampada.sovani@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 2:08 am

Web Title: prakash departmental stores in pune
Next Stories
1 हरवलेला तपास : दरीपुलावरून फेकलेल्या महिलेच्या खुनाची उकल नाहीच
2 पुणेकरांना नववर्षाची भेट, शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रोला मंजुरी
3 चाकणमधील सापांच्या विषाच्या तस्करीचे उत्तर प्रदेश कनेक्शन
Just Now!
X