‘कला, उद्योजकता आणि सेवेचा सत्कार ज्या समाजात होतो, तोच समाज पुढे जातो,’ असे मनोगत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध उद्योजक कल्पना सरोज, ज्येष्ठ गायिका देवकी पंडित आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. विजया नातू यांना ‘श्रीमती लक्ष्मीबाई गोखले स्मृती पुरस्कार’ प्रदान करून जावडेकर यांच्या हस्ते त्यांचा रविवारी गौरव करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
प्रशासकीय अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे. परंतु त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत. विश्वजा गोखले, आमदार मेधा कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या.
जावडेकर म्हणाले, ‘या तिन्ही महिलांनी आपल्या कर्तृत्वाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. उद्योजकतेसाठी शिक्षण आणि इतर बाबींपेक्षा आंतरिक ऊर्मीच अधिक महत्त्वाची असते हे कल्पना सरोज यांनी दाखवून दिले. ज्याला संगीत कला अवगत असते, त्या व्यक्तीत त्या रूपाने देवच वसलेला असतो, अशा क्षेत्रात पंडित यांचे कर्तृत्व आहे. खेडय़ांमध्ये जिथे स्पेशालिस्ट डॉक्टर नसतात आणि एकच डॉक्टर ‘ऑल इन वन’ असतो अशा ठिकाणी कोकणात डॉ. नातू यांनी काम केले. कला, उद्योजकता आणि सेवेचा सत्कार ज्या समाजात होतो, तोच समाज पुढे जातो.’