प्रकाश जावडेकर यांची टीका

न्यायपालिकांमध्ये सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नसताना देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत काँग्रेस अश्लाघ्य राजकारण करत आहे, अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी काँग्रेसवर टीका केली. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चार वरिष्ठ न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवर जावडेकरांनी भाष्य केले.

एका कार्यक्रमानिमित्त जावडेकर पुण्यात आले होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या भारतीय जनता पक्षाची देशातील एकोणीस राज्यांत सत्ता आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांत निवडणुका होत आहेत. या राज्यांमध्येही भाजपला जोरदार समर्थन मिळत आहे. तसेच एप्रिलमध्ये कर्नाटक राज्यात होणाऱ्या निवडणुकीमध्येही भाजपच विजयी होईल. त्यामुळे भाजपशासित राज्यांची संख्या तेवीसवर पोहोचणार आहे. त्यामुळे आगामी काळात ‘बीजेपी एव्हरीवेअर, काँग्रेस नोव्हेअर’, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. काँग्रेसशासित राज्यांतील जातीयवादी राजकारण, गुन्हेगारी, वाढते बलात्कार यांबाबत लक्ष केंद्रित करण्याऐवजी काँग्रेस संकीर्ण राजकारण करत आहे.

कर्नाटकात ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ इंडिया’ ही दहशतवादी संलग्न संघटना असून तिने चोवीस नागरिकांचा बळी घेतला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या संघटनेवरील १७५ खटले मागे घेतले असून सिद्धरामय्या सरकार या संघटनेबरोबर आघाडीसाठी प्रयत्न करत आहे. वास्तविक कर्नाटकात कायदा – सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. बलात्कार, खून, दरोडे, चोऱ्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून पत्रकार गौरी लंकेश, विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्यासह भाजपच्या चोवीस कार्यकर्त्यांच्या खुनाचा छडा अद्यापही लागलेला नाही. एक वर्षांत तेथील साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा फटका काँग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही, असेही जावडेकर यांनी सांगितले.