सध्या नाटकांची संख्या अधिक झाली असल्याने प्रेक्षकांचा गोंधळ उडतोय, अशी भावना प्रसिद्ध अभिनेता आणि नाटय़निर्माता प्रशांत दामले याने व्यक्त केली. चॉईस खूप दिल्याने गोंधळ हा उडणारच. त्यामुळे प्रेक्षक मराठी नाटकांकडे पाठ फिरवतो असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.
हिंदी मालिकेमध्ये व्यस्त असलेला प्रशांत दामले आता दोन वर्षांसाठी रंगभूमीवर काम करणार नाही. नाटक बंद करणे हीच मनाला लागणारी गोष्ट आहे. हा अर्धविराम आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सात वर्षे सुरू आहे. त्याच धर्तीवर ही मालिका गाजली तर कदाचित रंगभूमीवरील काम हा पूर्णविरामही ठरु शकतो. मी ५४ वर्षांचा आहे. जर मी नाटकात काम करू शकलो नाही तर, टी-स्कूलच्या माध्यमातून शिक्षक म्हणून माझी हौस भागवून घेईन, असेही प्रशांत दामले याने सांगितले. ३१ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बेशिस्तपणा फार झाला. फिटनेसचा विचार करता रात्री घरचे जेवण आणि सुखाची झोप महत्त्वाची वाटते. दूरचित्रवाणी मालिकेमुळे छोटय़ा पडद्याच्या माध्यमातून देश-परदेशात झळकण्याची संधी दवडता कामा नये या उद्देशातून हा प्रकल्प स्वीकारला, असेही त्याने प्रांजळपणे सांगितले.
‘गेला माधव कुणीकडे’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकांनी मला पैसा मिळवून दिला. संयम, आत्मविश्वास, स्थैर्य दिले. परमेश्वराने योग्य वेळी ही नाटकं पदरात टाकून माझ्याकडून योग्य काम करून घेतले. अडचणीच्या काळात शांतं कसं रहायचं हे शिकवलं. नाटकांमधून विविध प्रकारचा विनोद साकारण्याची संधी मिळाली, अशा शब्दांत प्रशांतने रंगभूमीविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे या अनौपचारिक गप्पा आयोजित करण्यात आल्या होत्या.
– ‘हर्बेरिअम’ ही संकल्पना म्हणून चांगली, पण नटासाठी घातक आहे. नाटक म्हणजे काय हे कळायलाच मुळी २५ प्रयोग लागतात. ते कळेपर्यंत त्याचे प्रयोग थांबतातच.
– नाटक हे लेखकाने दिलेले भाडय़ाचे घर आहे. तिथे नट या भाडेकरूने आपले सामान बसवायचे आणि त्या घराशी एकरूप झाल्याचे दाखवायचे आहे.
– सध्याची कलाकारांची पिढी बघते आणि ऐकते, पण वाचत नाही. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व येत नाही. बालपणी बोट ठेवून वाचायला लावण्याचे संस्कार झाले. त्याचा मला फायदा झाला.