‘ ‘चंद्रकांत चिपलुनकर’मध्ये काम करण्यापूर्वी ‘हिंदीत आणि त्यातही ‘डेली सोप’मध्ये काम करणे तुला जमेल का,’ असे म्हणत मित्रांनी मला घाबरवले होते! नाटकाच्या तालमी होऊन २०-२५ प्रयोगांनंतर नाटक ‘सेट’ होते. पण ‘डेली सोप’ म्हणजे रोज नव्याने केलेली एकांकिका आहे. प्रत्येक ‘सीन’नंतर थांबत-थांबत विनोद करणे मी आता शिकून घेतले आहे!..’ अभिनेते प्रशांत दामले सांगत होते.
‘सब’ वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘चंद्रकांत चिपलुनकर सीडी बम्बावाला’ या मालिकेतील प्रमुख जोडी – प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड बुधवारी मालिकेच्या प्रसिद्धीसाठी पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या.
अग्निशमन कर्मचारी असलेला चंद्रकांत चिपळूणकर कुणाच्याही विनंतीला कधीच नकार न देण्याच्या आपल्या स्वभावामुळे कसा अडचणीत सापडतो याची हलकीफुलकी गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आल्याचे दामले यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘माझी नाटके ‘सीनिअर केजी’तल्या मुलापासून ‘सीनिअर सिटिझन’पर्यंत सर्वाना एकत्र बसून पाहता यावीत असा माझा आग्रह असायचा. मी करीन ती मालिकाही तशीच ‘स्वच्छ’ विनोद असलेली हवी अशी माझी इच्छा होती. ‘चिपलुनकर’मध्ये काम करण्यापूर्वी ‘हिंदीत विनोद करणे जमेल का,’ असे म्हणत मित्रांनी घाबरवले होते. विनोदात ‘टायमिंग’ला खूप महत्त्व असते आणि ते ‘टायमिंग’ सर्व भाषांमध्ये सारखेच असते. मराठीत जसा उत्स्फूर्त विनोद जमतो, तसा हिंदीतही जमेल. हिंदी भाषेत कोणत्या वेळी विनोदासाठी कोणता शब्द वापरायला हवा हे कळेपर्यंत थोडा वेळ जातो इतकेच. मालिकेत प्रत्येक ‘सीन’नंतर थांबून पुन्हा पुढच्या ‘सीन’ला त्याच ऊर्जेने, तितकाच दर्जेदार विनोद करायचा असतो. थांबत-थांबत विनोद करण्याचे हे तंत्र नाटकांच्या ३०-३२ वर्षांत अनुभवलेच नव्हते. पण ‘चिपलुनकर’साठी ते मी शिकून घेतले आहे.’’
कविता लाड यांनी या मालिकेत ‘चंद्रकांत’च्या पत्नीची ‘हेमाली चिपलुनकर’ची भूमिका निभावली आहे. त्या म्हणाल्या, ‘‘हेमाली ही गुजराती कुटुंबातली मुलगी आहे. वडिलांच्या जावयाबद्दल असलेल्या नाराजीमुळे होणारी घालमेल मला दाखवायची होती. मराठमोळा चेहरा असताना गुजराती हावभाव कसे करावेत, विशिष्ट हेल काढून बोलावे का अशा गोष्टींबद्दल माझ्या मनात थोडा संभ्रम होता. पण मालिकेचे दिग्दर्शक धर्मेश मेहता यांच्याशी बोलल्यानंतर मी संवादांमध्ये अधूनमधून एखादाच गुजराती शब्द बोलावा, कुणाचीही चेष्टा केल्यासारखे वाटू नये याची काळजी घ्यावी असे ठरले. आम्हाला अजून मराठीतच विचार करण्याची सवय असल्यामुळे हिंदीतला एखादा शब्द पटकन आठवत नाही. पण मग हिंदी सहकलाकारांना विचारून लगेच तो माहीत करून घेतला जातो.’’
 
जेव्हा प्रशांत दामले ‘स्टंट’ करतात..!
प्रशांत दामले या मालिकेत अग्निशमन कर्मचारी असल्यामुळे त्यांना वेगवेगळे ‘स्टंट’ करणे अपरिहार्य होते. नुकत्याच केलेल्या अशाच एका स्टंटची आठवण दामले यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘‘विहिरीत पडलेल्या उंदराला वाचवण्यासाठी विहिरीत उतरण्याचा ‘सीन’ आम्ही नुकताच चित्रित केला. फिल्म सिटीमधल्या त्या विहिरीच्या शेजारून ओढा वाहत असल्यामुळे विहिरीला चांगलेच पाणी होते. पाण्यात उतरून संवादातील ५-१० वाक्ये म्हणेपर्यंत पाणी चांगले ४-५- फूट वर चढत असे. त्यामुळे सारखे पाणी उपसण्यासाठी थांबावे लागे. त्या दिवशी मी दिवसभर पाण्यातच राहिलो. चहा-बिहा देखील पाण्यातच घेतला!’’
मराठी लोकांना मी हिंदीत गेल्याचा अभिमानच!
प्रशांत दामले म्हणाले, ‘‘नाटक हे अडीच तासांचे ‘पॅकेज’ असते. त्याची सवय असलेल्या मराठी रसिकांना ‘डेली सोप’चे बावीस मिनिटांचे ‘पॅकेज’ पचनी पडायला कदाचित थोडा वेळ लागेल. ‘मराठीत आम्ही तुम्हाला खूप ‘मिस’ करतो, पण तुम्ही हिंदीत गेल्याचा खूप अभिमान वाटतो,’ असे अनेक मराठी रसिक आवर्जून सांगतात.’’