स्वातंत्र्यलढय़ात आपले अमूल्य योगदान दिलेल्या विजयालक्ष्मी पंडित या भारताच्या मेक्सिकोतील प्रथम राजदूत होत्या. त्या काळापासून भारत आणि मेक्सिको या देशांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. राष्ट्रपती म्हणून केलेल्या अधिकृत दौऱ्यांमध्ये मी सर्वप्रथम मेक्सिकोचा दौरा केला होता. मेक्सिको आणि भारत या दोन्ही देशांपुढे असलेले नागरी प्रश्न हे समान असल्याने दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यातून ते सोडवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शनिवारी केले.

मेक्सिको सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणारा ‘ऑर्डेन मेक्सिकाना दे अ‍ॅग्विला अ‍ॅझटेका’ हा पुरस्कार मेक्सिकोच्या भारतातील राजदूत सॅन्युआ एल्बा प्रिया यांनी प्रतिभा पाटील यांना शनिवारी प्रदान केला. या कार्यक्रमात पाटील बोलत होत्या. मेक्सिकोच्या जडणघडणीत पाटील यांनी दिलेल्या योगदानाबाबत कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार प्रदान करत असल्याचे मेक्सिको सरकारतर्फे यावेळी सांगण्यात आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, नेल्सन मंडेला, राणी एलिझाबेथ द्वितीय, बिल गेट्स यांना यापूर्वी या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पाटील यांनी या सोहळ्याची आठवण म्हणून मेक्सिकोच्या राजदूत सॅन्युआ एल्बा प्रिया यांना म. गांधी यांच्या स्मृतीचे प्रतीक असलेला चरखा भेट म्हणून दिला. पाटील भारताच्या राष्ट्रपती असताना २००७ मध्ये मेक्सिकोचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर आले होते. त्यांच्या निमंत्रणावरून पाटील यांनी २००८ मध्?ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध अधिक बळकट झाले.

रिक्षातून फिरणारी राजदूत

मेक्सिकोच्या भारतातील राजदूत सॅन्युआ एल्बा प्रिया या आपले सरकारी वाहन म्हणून चक्क रिक्षा वापरतात. प्रतिभा पाटील यांच्या सन्मानार्थ पुणे शहरात आलेल्या प्रिया यांचा परिचय समाजमाध्यमात रिक्षातून फिरणाऱ्या राजदूत म्हणून चर्चेत असलेल्या त्या याच अशा शब्दात करून देण्यात आला. त्यावेळी, सीएनजी वरील रिक्षा वापरल्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागतो म्हणून आपण रिक्षा वापरत असून भारतातील हजारो नागरिक रिक्षाने प्रवास करतात. त्यामुळे मी काही विशेष करते आहे असे वाटत नसल्याचे प्रिया यांनी सांगितले.