डिझेल व गाडय़ांच्या सुटय़ा भागांच्या दरवाढीबरोबरच विविध कारणांनी तोटय़ात गेलेल्या एसटीला सावरण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पुढाकर घेणार आहे. संघटनेच्या वतीने प्रवासी वाढवा अभियान राबविण्याबरोबरच शासनाकडून देय असलेली रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. एसटीची आर्थिक स्थिती सध्या बिकट झाली आहे. उत्पन्न वाढून एसटीला आर्थिक स्थैर्य मिळावे व एसटीची वाढ व्हावी, यासाठी संघटनेटच्या वतीने प्रवासी वाढवा अभियान सुरू करण्यात येणार आहे. एसटीच्या सेवेपासून दूर गेलेल्या प्रवाशांना एसटीकडे परत वळविण्यासाठी या अभियानात प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे उत्पन्नवाढीसाठी शासकीय पातळीवरील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
शासनाकडून देय असलेली सुमारे २०११ कोटी रक्कम रक्कम मिळावी. अन्य राज्याप्रमाणे प्रवासी कराचा दर कमी करावा. पथकर माफ करावा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अवैध खासगी प्रवासी वाहतूक बंद करावी. अन्य राज्यांप्रमाणे एसटीच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य करून एसटीसारख्या सार्वजनिक उपक्रमाला अधिक बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री व लोकप्रतिनिधींना करण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत संघटनेने एसटी प्रशासनाला उत्पन्न वाढीच्या दृष्टीने केलेल्या सूचनांचाही पाठपुरावा करण्यात येणार आहे. गाडय़ा वेळेवर जाण्यात येणारे अडथळे दूर करावेत. समांतर वाहतूक बंद करावी. सुटय़ा भागांचा तुटवडा, अपुरा कामगार वर्ग, स्पील लॉकचा अतिरेक, प्रवाशांच्या अपेक्षेनुसार वेळांमध्ये बदल, उत्पन्नवाढीसाठी वाहक व चालकांच्या सूचनांची दखल घेणे, डेपो हा उत्पन्नवाढीचा केंद्रबिंदू असल्याने त्याकडे विशेष लक्ष द्यावे आदी मुद्दे प्रशासनाकडे मांडण्यात येणार आहेत. उत्पन्नवाढीच्या दृष्टीने डेपोनिहाय सूचनांचे निवेदन २५ नोव्हेंबपर्यंत सर्व विभाग नियंत्रक व प्रादेशिक व्यवस्थापकांना देण्यात येणार आहे. राज्यभरातील मुद्दय़ांचे संकलन करून उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनाही निवेदन देण्यात येणार आहे, असे संघटनेने कळविले आहे.