पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका गावामध्ये रिटा कुंभार यांना जात पंचयातीने बहिष्कृत करत एक लाख रुपये, पाच दारुच्या बाटल्या, पाच बोकड असा दंड करुन एक प्रकारे खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तसेच समाजात आज देखील जात पंचायती सारख्या घटना घडत आहे. या प्रकरणी येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असून आता राज्य सरकारने राज्यातील अनेक भागात जात पंचायती विरोधी अभियान राबविले पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केली.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, राज्यात मागील काही वर्षात जात पंचायतीच्या घटना लक्षात घेता. २०१६ साली समाजिक बहिष्कार कायदा आणला गेला. तरी देखील अद्याप ही अशा घटना घडत असून या घटना सामाजिक आणि एकतेला धक्का देणारे आहेत. एका बाजूला सरकारची भूमिका आहे की, जातिवाचक वाड्या वस्ती वरील नावे बदली जाणार, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ढोल वाजवितो. त्याच दरम्यान अशा घटना घडतात. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मी ग्रामीण अधीक्षक यांची भेट घेतली आहे. या घटनेबाबत त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली असून लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. मात्र अद्याप ही जात पंचायती च्या माध्यमातून समाजात जे घटना घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जो कायदा २०१६ आणला गेला आहे. त्या बदल समाजात जनजागृती करण्याच्या दृष्टीने राज्यभर अभियान राबविण्याच्या दृष्टीने पावली उचलली गेली पाहिजे. यासाठी येणार्‍या अधिवेशनात याबद्दल आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.