महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उमेदवारांना मोबाइलवर संदेश पाठवून सावध केले आहे. रविवारी (१७ फेब्रुवारी) होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेदरम्यान उमेदवार चर्चा करताना किंवा बोलताना आढळल्यास तत्काळ परीक्षा रद्द केली जाणार असल्याचे आयोगाकडून उमेदवारांना पाठवलेल्या संदेशात नमूद केले आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी राज्यभरातील ३७ जिल्ह्य़ांतील १ हजार ८६ उपकेंद्रांवर घेतली जाणार आहे. नुकताच आयोगावर मासकॉपीचा आरोप करण्यात आला होता. त्यावर आयोगाने खुलासाही केला. परीक्षेमध्ये वेगवेगळ्या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येतो, प्रत्येकाला वेगळा प्रश्नसंच दिला जात असल्याने गैरप्रकाराला वाव नाही. त्यामुळे मासकॉपी शक्य नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर आयोगाने गैरप्रकार रोखण्यासाठी उमेदवारांना मोबाइलवर संदेश पाठवून परीक्षेदरम्यान चर्चा करताना अथवा बोलताना आढळल्यास परीक्षेच्या नियम आणि अटींचा भंग केल्याप्रकरणी तत्काळ परीक्षा रद्द केली जाणार असल्याचा इशारा दिला. आयोगाद्वारे प्रथमच उमेदवारांना अशा प्रकारे संदेश पाठवून गैरप्रकार न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयोगाच्या या संदेशाची उमेदवारांमध्ये चर्चा आहे. रविवारी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या आधी अर्धा तास उपस्थित राहण्याची सूचनाही आयोगाने केली आहे.