मुले दत्तक देण्याऱ्या संस्थेच्या पाहणीसाठी आल्यानंतर त्यांचा पाहुणचार घेऊन पदाचा दुरूपयोग करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्य़ातून सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स एजन्सी (कारा) चे माजी संचालक जे. के. मित्तल यांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लागला आहे. मुले दत्तक गैरप्रकार प्रकरणात प्रीतमंदिर संस्थेच्या पाच जणांसह मित्तल यांना सीबीआयने आरोपी केले आहे.
भारतातील अनाथ मुलांना परदेशात दत्तक देण्याऱ्या संस्थांवर लक्ष ठेवण्याचे काम सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स एजन्सी (कारा) करते. मित्तल हे या संस्थेचे माजी संचालक आहेत. सीबीआयने पुण्यातील प्रीतमंदिर संस्थेतील मुले दत्तक गैरप्रकार उघकडकीस आणून याप्रकरणी मित्तल यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. मित्तल हे ७ ते ९ जून २००७ दरम्यान पुण्यातील दत्तक देणाऱ्या संस्थांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्या वेळी ते लष्कर भागातील एका हॉटेलमध्ये राहिले. त्या हॉटेलचे झालेल्या बिलापैकी काही रक्कम प्रीतमंदिर संस्थेने भरल्याचे तपासात समोर आले होते. त्याच बरोबर जानेवारी २०१० मध्ये प्रीतमंदिर संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांने एका कर्मचाऱ्यामार्फत त्यांना पन्नास हजार रुपये दिल्याचा आरोप आहे. मुले बेकायदा दत्तक देण्याच्या प्रकरणात प्रीतमंदिरच्या पाच जणांबरोबर सीबीआयने मित्तल यानाही आरोपी केले आहे.
याप्रकरणी मित्तल यांनी मार्च २०१३ मध्ये गुन्ह्य़ातून वगळण्यासाठी अर्ज केला होता. सीबीआयने सादर केलेल्या कागदपत्रांवरून मित्तल यांच्यावर ठेवलेल्या आरोपासंदर्भात प्रथमदर्शनी पुरावे दिसून येत असल्याचे स्पष्ट करून विशेष न्यायाधीश एस. व्ही. यार्लगड्डा यांनी मित्तल यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.