प्रवाशांना उपयुक्त असल्याने योजनेचे नियोजन

पुणे : शहरातील रेल्वे आणि एसटी स्थानकांबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणाहून कोणत्याही वेळेला सुरक्षित आणि योग्य भाडय़ात प्रवासाची हमी देणारी प्रीपेड रिक्षा योजना शहरात पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा प्रादेशिक प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी सुरू करण्यात आलेली ही योजना योग्य नियोजनाअभावी फसल्याने गुंडाळण्यात आली होती. त्यामुळे मागील वेळेला झालेल्या चुका या वेळी टाळाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

शहरातील रेल्वे किंवा एसटी स्थानकामध्ये रात्री एखादा प्रवासी उतरल्यास शहरात विविध ठिकाणी जाण्यासाठी अनेकदा रिक्षा चालकाकडून मानमानी पद्धतीने भाडेवसुली केली जाते. पर्याय नसल्याने प्रवासी या मनमानीला बळी पडतात. त्याचप्रमाणे रात्री सुरक्षित प्रवासाचीही हमी मिळत नाही. याच गोष्टी लक्षात घेऊन शहरात सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रीपेड रिक्षा योजना सुरू करण्यात आली होती. शिवाजीनगर, स्वारगेट एसटी स्थानक आणि पुणे रेल्वे स्थानकावर या योजनेसाठी बुथही उभारण्यात आले होते. काही दिवस हे बुथ सुरू राहिले. मात्र, भाडय़ाचा मुद्दा, वाहतुकीला होणारा अडथळा आणि रिक्षाचालकांची अनुत्सुकता लक्षात घेता एकेक बुथ बंद पडला. पुणे रेल्वे स्थानकावरील बुथबाबतही प्रवाशांच्या विविध तक्रारी होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील प्रीपेड रिक्षाही काही दिवसांनी बंद झाली.

पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कालावधीत ही योजना पुन्हा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. बुथसाठी एसटी प्रशासनाने जागा देण्याबाबत तत्त्वत: तयारी दर्शविली होती. प्रीपेड योजनेसाठी खास संगणकप्रणालीही तयार केली होती. या प्रणालीमध्ये शहरातील सर्व अधिकृत रिक्षांची माहिती टाकण्यात आली होती. त्याचप्रमाणे या संगणकप्रणालीत ठिकाण व त्यासाठी द्यावे लागणारे भाडे आदींचाही समावेश करण्यात आला होता. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने आखलेली ही योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वी हे प्राधिकरण बरखास्त झाले. त्यावर पुढे काहीही काम होऊ न शकल्याने योजना सुरू होण्यापूर्वीच गुंडाळण्यात आली.

जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या पुढाकाराने आता प्रीपेड योजनेला नव्या स्वरूपात पुन्हा आणण्यात येणार आहे. पुणे, स्वारगेट आणि शिवाजीनगर येथे योजना सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पोलिसांच्या नियंत्रणाखाली ही योजना पुन्हा आणण्याचे नियोजन असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. एकदा प्रत्यक्षात ही योजना सुरू झाली होती आणि दुसऱ्यांदा योजनेचा पूर्ण आराखडाही तयार झाला होता. त्यानंतरही योजना सुरू होऊ शकली नाही.

ऑटोररिक्षा प्रीपेड बुथ सुरू करण्याबाबत जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रीपेड रिक्षा सेवा लोकप्रिय असून, ती पुणे, स्वारगेट, शिवाजीनगर येथे पुनर्जीवित करून पोलीस विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यान्वित करण्यात येईल.

– बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी