साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला शनिवारी (६ एप्रिल) सूर्योदयाच्या पहिल्या प्रहरामध्ये म्हणजे सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेमध्ये गुढी उभारून पूजन करावे. दुपारी नैवेद्य दाखविल्यानंतर सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवावी, अशी माहिती शारदा ज्ञानपीठचे पं. वसंतराव गाडगीळ यांनी दिली.

गाडगीळ म्हणाले,की महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा हा मराठी वर्षांरंभ दिन मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळेच गुढीपूजनाला ब्रह्मध्वजपूजनही म्हटले जाते. सूर्योदयापूर्वी गुढी उभारून सूर्यास्ताला गुढी उतरवावी. गुढी उभारून ब्रह्माचे म्हणजेच ज्ञानाचे पूजन केले जाते. गुढी उभारताना स्त्री-पुरुष असा कोणताही भेद मानला जात नाही.  गुढी उभारण्यापूर्वी स्नान करून घरच्या देवांची पूजा आणि आई-वडिलांना नमस्कार करावा. भारतीय पंचांगानुसार कालगणनेची सुरुवात शालिवाहन शकापासून झाली. शालिवाहन राजाने शकांचे दमन करुन विजय मिळवला. त्यामुळेच चैत्र प्रतिपदा हा नववर्षांरंभाचा दिवस मानला जातो.

गुढी पाडवा हा नवीन संकल्प करण्याचा दिवस

चैत्र शुद्ध प्रतिपदेला भारतीय नूतन संवत्सर सुरू होत आहे. शनिवारी वैधृति योग असला तरी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडव्याचा दिवस शुभच आहे. नेहमीप्रमाणे गुढी उभी करून गुढीची पूजा करावी आणि पंचांगस्थ श्रीगणपतीचे पूजन करावे. गुढी पाडवा हा नवीन संकल्प करण्याचा दिवस आहे, असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले.