News Flash

प्रेरणा: सारे काही संस्कृत भाषेच्या संस्कारांसाठी…

संस्कृत टिकवले पाहिजे त्याबरोबरच त्याचा वापर वाढविला पाहिजे. या उद्देशाने त्यांनी संस्कृत शिकविण्यास सुरुवात केली.

विनोदिनी जोशी आणि अमृता लेले
  • श्रीराम ओक

संस्कृतची आवड, जाण आणि संस्कृतचा प्रसार व्हावा अशी तळमळ असणाऱ्या अनेक गृहिणींना एकत्र आणले ते संस्कृतभाषा संस्थेच्या माध्यमातून विनोदिनी जोशी यांनी. आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी संस्कृत शिकवणाऱ्या अनेक शिक्षिका घडवल्या, त्यापैकी एक म्हणजे अमृता संजय लेले.

बदल घडविण्यासाठी गरज असते ती ध्यासाची. या ध्यासाने काय बदल होऊ शकतात हे विनोदिनी श्रीकृष्ण जोशी यांच्याकडे पाहून जाणवते. या ध्यासामध्ये आपल्या वाढत्या वयाचा विचार बाजूला ठेवत त्यांनी सुरू ठेवलेल्या कार्यामुळे आज अनेक गृहिणींना आपला वेळ सत्कारणी लावता येतो आहे. याशिवाय आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी आणि त्याबरोबरच उद्याच्या पिढीला संस्कृत भाषेची महती वर्णन्याबरोबरच त्यांना संस्कृत शिकण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. आज वय वर्ष केवळ ८२ असलेल्या विनोदिनी या मुंबई येथे शाळेत बत्तीस वर्ष शिक्षिकेची नोकरी करीत होत्या. १९९५ साली निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपला उपलब्ध वेळ संस्कृत भाषेच्या केवळ प्रचार-प्रसारासाठी न देता प्रत्यक्ष संस्कृत शिकविण्यासाठी देण्याचे ठरवले.

बालमनावर संस्कृत भाषेचे हसतखेळत संस्कार व्हावेत, ही भाषा समजण्यास व बोलण्यास अतिशय सोपी आहे हे लक्षात यावे, या भाषेविषयीची अनाठायी भीती नष्ट व्हावी, पुढील इयत्तांमध्ये भरपूर गुण प्राप्त होत टक्केवारी वाढावी अशा विविध उद्दिष्टांवर आधारित ‘संस्कृत भाषासंस्था’ ही संस्था मुंबई येथे कार्यरत आहे. ही संस्था कै. ग. वा. करंदीकर यांनी स्थापन केली होती. त्या संस्थेच्या माध्यमातून विनोदिनी यांनी काही कार्य सुरू केले. २००० साली पुण्यात आल्यानंतर याच संस्थेची पुणे शाखा सुरू करण्याचे आणि या शाखेच्या माध्यमातून हजारो विद्याार्थ्यांपर्यंत संस्कृत विषय सोपा करून पोहोचविण्याचे श्रेय विनोदिनी जोशी यांच्याबरोबरच त्यांच्या सर्व शिक्षिकांना जाते. त्यांच्या पतीसह, दोन मुलांच्या मौलिक पाठिंब्यामुळे या कार्यात त्यांना स्वत:ला झोकून देता आले. समविचारी अनेक सहकारी मिळत गेल्यामुळे त्यांच्या कार्यासाठी अनेक हातांची साथ मिळाली.

घोकमपट्टी आणि पाठांतर या प्रकाराशिवायही कोणत्याही वयाचे संस्कृत शिकण्यास इच्छुक असणारे ‘संस्कृत भाषासंस्थे’च्या पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास करू शकतात. या पुस्तकांच्या बरोबरीने तज्ज्ञ शिक्षकांची जोड मिळाली, तर उच्चारणतंत्र शिकण्यास सोपे जाऊ शकते. त्यामुळेच संस्थेच्या चाळीस शिक्षिका पुण्यातील विविध शाळांच्या माध्यमातून संस्कृत शिकवतात. आठवड्यातून घड्याळी चार तासांचा वेळ देत विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यास प्रोत्साहित करण्याबरोबरच मार्गदर्शनही त्या करीत आहेत. या सगळ्या अभ्यासाला एक शिस्त असल्यामुळे संस्थेच्या पुणे शाखेमार्फतही प्रशिक्षणाबरोबरच परीक्षांचे नियोजन केले जाते. हे प्रशिक्षण इच्छाशक्ती असणारे कोणत्याही माध्यमातील विद्यार्थी घेऊ शकतात. अशी इच्छाशक्ती असणाऱ्या पुण्यातील निरनिराळ्या शाळांतील इयत्ता पाचवीपासून सातवीपर्यंतचे विद्याार्थी काही पुस्तके आणि संस्थेने नेमून दिलेल्या मार्गदर्शकांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहेत. यासाठी शाळेतर्फे आठवड्यातून दोन तासिकांचा वेळ या शिक्षकांना दिला जातो.

बालमनावर संस्कृत भाषेचे संस्कार व्हावेत यासाठी संस्कृत गद्या-पद्या पाठ ऐकून, बोलून घेता यावेत, या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘संस्कृत भाषासंस्था’ या संस्थेच्या पुणे शाखेच्या संचालिका म्हणून जोशी कार्यरत आहेत. त्यांनी जेव्हा हा उपक्रम सुरू केला, तेव्हा या अभ्यासासाठी इच्छुक अशी साठ मुले त्यांना मिळाली होती आणि ती संख्या वाढत जाऊन चारशेहून अधिक झाली आहे. सुरुवातीला त्यांनी दिलेल्या निवेदनामुळे जयश्री गोडसे, मधुरा गोखले, अमृता लेले, बोंद्रे दाम्पत्य ही सारी मंडळी संस्थेची पुण्यात उभारणी झाली तेव्हापासून विनोदिनी यांच्याबरोबर कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात शिक्षक तयार करण्यासाठी कार्यशाळा देखील घेतल्या गेल्या. या सगळ्या मार्गदर्शक चमूमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांसह संस्कृत तसेच मराठीमध्ये एम. ए. झालेली मंडळी कार्यरत आहेत. संस्कृत भाषेबाबत असणारे त्यांचे प्रेम परीक्षा पद्धतीमध्ये अचूक मूल्यांकन करते आणि कोणत्याही पद्धतीने अशुद्ध लेखन असणार नाही, याचे भान परीक्षांचे मूल्यांकन करताना दिले जाते.

पुण्याजवळील तळेगाव येथेही या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात येते, शाळेच्या शिवायही वैयक्तिक पातळीवरील संस्कार वर्ग, बालभवने किंवा खासगी क्लासेसमध्ये योग्य ती विद्याार्थिसंख्या संस्था निर्माण करू शकत असेल, तर तेथेही संस्कृत मार्गदर्शनाला सुरुवात करण्याचा या मंडळींचा मानस आहे.

या सगळ्या शिक्षकांपैकीच एक असणाऱ्या अमृता संजय लेले. या देखील बारा वर्षांपासून संस्थेबरोबर कार्यरत आहेत. त्यांनीही एम. ए. संस्कृत केले असून सुरुवातीला त्यांनी निवृत्त कर्नल कै. मकरंद साठे यांच्याबरोबर संस्कृतच्या प्रचाराचे कार्य केले, हे करीत असतानाच त्यांचा परिचय विनोदिनी जोशी यांच्या कार्याबरोबर झाला आणि त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक तास संस्कृतच्या प्रचारासाठी कशाचीही अपेक्षा न ठेवता देण्याचे ठरविले. संस्कृत टिकवले पाहिजे त्याबरोबरच त्याचा वापर वाढविला पाहिजे. या उद्देशाने त्यांनी संस्कृत शिकविण्यास सुरुवात केली. त्यांनी अगदी शिशुगटातील विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांनी विविध क्लृप्त्याही वापरल्या. छोटा आणि मोठ्या गटाला शिकवताना प्रभावी संवादाचा त्यांना उपयोग झाला. छोट्या मुलांना शिकवणे आव्हानात्मक असूनही त्यांनी हे आवाहन स्वीकारले आणि हे इंद्रधनुष्य पेलूनही दाखवले. रंगांचा तक्ता, वापरातील वस्तूंचे, कपड्यांचे रंग अशा विविध क्लृप्त्या वापरून, आपले शिकविण्याचे कसब वापरून त्यांच्या शिकवण्याच्या वृत्तीमुळे ही छोटी मुले देखील आनंदाने शिकतात. याचे प्रत्यंतर इतक्या सहजपणे येते की अमृता यांच्याशी संवाद साधताना ही मुले संस्कृतचा वापर करतात. आपला परिचय करून देण्याबरोबरच छोटे-छोटे प्रशद्ब्रा संस्कृतमध्ये विचारतात, त्यातून त्या मुलांची आणि पर्यायाने पालकांचीही आपल्या पाल्यांना संस्कृत शिकवण्याची आत्मीयता दिसून येते. ही मुले संस्कृतमधून गोष्टही धिटाईने सांगतात, ते पाहून आपण मंडळी नक्कीच चकित होऊ. तुम्हालाही या उपक्रमाचा लाभ करून घ्यायचा असेल किंवा आपल्या संस्था, शाळांमधील मुलांना सहभागी करून घेण्याची इच्छा असल्यास तुम्ही अमृता लेले यांच्याशी ९८८१६९४०१४ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

– श्रीराम ओक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 10:30 pm

Web Title: prerana sanskrit language teacher vinodini joshi amruta lele
Next Stories
1 पुण्यात पोलिसाच्या पत्नीची दोन वर्षांच्या मुलाची हत्या करुन आत्महत्या
2 कांदा दराचा शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही फटका
3 सुसज्ज, सुंदर पुण्याचा ई-प्रवास
Just Now!
X