– श्रीराम ओक

हौस या शब्दामागे मौज जेवढी दडली आहे, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटीने जबाबदारी या शब्दाला आणि जाणीवेलादेखील तेवढेच महत्त्व आहे. घरात विविध पक्षी, प्राणी आणून त्यांचा सांभाळ करणारी मंडळी आपण आपल्या अवतीभोवती नेहमीच पाहतो, पण ज्या प्राणी, पक्ष्यांशी आपला दुरान्वयेही संबंध नाही, अशा प्राणी, पक्ष्यांना खाऊ-पिऊ घालणे, त्यांच्यावर औषधोपचार, त्यांचे लसीकरण आणि वेळप्रसंगी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठीही तन-मन-धनाने पुढे येणे हे अनवट कार्य. या कार्यात पसारे कुटुंबीय एक तपाहूनही अधिक काळ कार्यरत आहे.

 

भूतदया या शब्दाचा शब्दकोषातील अर्थ माहिती असला तरी त्याची प्रचिती येते ती सुवर्णा अरुण पसारे आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत या शब्दाला सार्थ असे कार्य करताना दिसतात तेव्हा. प्राणी, पक्ष्यांची विशेष आवड नसतानाही विपणन क्षेत्रात नोकरीच्या निमित्त कार्यरत असल्यामुळे सतत फिरस्ते असणाऱ्या अरुण पसारे यांना रस्त्यावरील लाचार, भुकेली, आजारी कुत्री पाहून त्रास व्हायचा. आपल्याला होणारा हा त्रास दूर करण्यासाठी त्यांच्या पुढे एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे त्या भुकेल्या जीवांना खाऊ घालणे. त्यासाठी बिस्किटांपासून अनेक खाद्यापदार्थांची खरेदी करून त्यांचे खाद्या या जीवांना खाऊ घालण्यातच पसारे यांच्या पगारातील खूप सारे पैसे खर्च व्हायचे. त्यातही आजारी, अपघातग्रस्त कुत्री असतील तर त्यांना रिक्षात घालून दवाखान्यापर्यंत नेण्याचे कार्यदेखील ते करीत होते. यामध्ये खर्च होणारा पैसा वाचवता यावा यासाठी त्यांच्या पत्नी सुवर्णा या त्यांच्या मागे उभ्या राहिल्या. आपल्या पतीच्या कार्यात खंबीरपणे उभे राहणेइतकेच नाही तर त्या प्राण्यांसाठी घरातून अन्न शिजवून देण्याचे कार्यही त्या करू लागल्या. ते खाणे घेऊन अरुण पसारे रस्त्यावर, गल्लोगल्ली फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना खायला घालू लागले. येथेच या दाम्पत्याला सामाजिक कार्याची दिशा मिळाली.

प्राण्यांची विशेष आवड नसतानाही, पतीला साथ देणारी ही सावित्री त्यावेळी आणि आजही निसर्गोपचार क्षेत्रात आणि ब्युटीपार्लर क्षेत्रातही कार्यरत आहे. आपला संसार सुखेनैव करीत असतानाच, त्यांच्यावर त्यांच्या आईची आणि लहान भावाचीही जबाबदारी. या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असतानाच आपल्या पतीच्या सामाजिक कार्याची जबाबदारीदेखील त्यांनी आपल्या शिरावर घेतली आणि आजही पतीच्या या कार्यात त्या सदैव बरोबर आहेत. पंचेचाळीसच्या आसपास वय असलेल्या या दाम्पत्याबरोबरच त्यांचा मुलगा मयुर हादेखील त्यांना त्यांच्या कार्यात मदत करतो. त्यांचे हे कार्य एक तपाहूनही अधिक काळ सुरू आहे. आपल्या कार्यात समाजाचाही हातभार असावा, या उद्देशाने त्यांनी ११ जानेवारी २०१६ साली ‘मेक न्यू लाईफ’ या संस्थेची नोंदणी केली. या संस्थेच्या माध्यमातून काही कार्यकत्र्यांच्या आणि देगणीदारांच्या मदतीने त्यांचे हे कार्य जोमाने सुरू झाले असून आज पन्नास कुत्र्यांचे पालनपोषण त्या आपल्या घरी आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेमध्ये करीत आहेत. याशिवाय पुणे शहरातील पाचशेच्या आसपास अनाथ, अपंग, भटक्या कुत्र्यांना ते अन्न पुरवित आहेत. केवळ अन्नच पुरविणे नाही तर या कुत्र्यांच्या नसबंदीबरोबरच त्यांना रेबीजचे लसीकरण करणे, अपघातग्रस्त, आजारी कुत्र्यांची सेवाशुश्रूषा करणे आदीमध्येदेखील पसारे कुटुंबीय आघाडीवर आहे.

त्यांनी केवळ भटक्याच कुत्र्यांचे पालकत्व घेतले आहे असे नसून अनेक हौशी मंडळी प्राण्यांचा नीट सांभाळ करीत नाहीत. एकतर त्यांची हौस फिटते किंवा कधी हे प्राणी आजारी पडले, तर त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या मालकांसाठी ते डोईजड होतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना सहजतेने रस्त्याची वाट दाखवली जाते. काही कुत्री चावतात, खूप भुंकतात, वेगवेगळ्या प्रकारच्या त्रास देतात अशी कारणे पुढे करीत त्या मुक्या जीवांचा विकृत छळ केला जातो. माणुसकीलाही काळीमा फासणारा हा विकृत छळ शब्दांत मांडणेही कठीण आहे, इतक्या पराकोटीचा असतो. अशा प्राण्यांना मालकांच्या तावडीतून सोडवून आणून त्यांचा सांभाळही पसारे कुटुंबीय आपुलकीने करते. निवासी भागात कुत्र्यांचा सांभाळ करताना अडचण येते, पण त्यांच्या पालनपोषणासाठी सुयोग्य जागाही उपलब्ध होत नसल्यामुळे या कार्यात पसारे यांना विविध अडचणींना तोंड द्याावे लागते. तरीदेखील न डगमगता, समस्यांमधून मार्ग काढीत त्यांनी हे कार्य नेटाने सुरू ठेवले आहे. सणांच्या, व्रतांच्या निमित्ताने अन्नाची, दुधाची नासाडी रोखली जावी आणि हे दूध, अन्न भुकेल्या जीवांच्या पोटी लागावे यासाठीदेखील पसारे दाम्पत्य पोटतिडकीने जाणीवजागृती करतात.

सुरुवातीच्या काळात दुचाकीवरून या जीवांसाठी अन्नाचे डबे नेणे, त्यांना उपचारांसाठी दवाखान्यात नेणे त्रासाचे होऊ लागले यासाठी त्यांनी रुग्णवाहिकेबरोबरच चारचाकी वाहनाचीदेखील सोय केली. संस्थेमार्फत भोसलेनगर, बावधन, मॉडेल कॉलनी आदी ठिकाणी कार्यकर्ते या जीवांना अन्न पुरविण्याचे कार्य करतात. सुवर्णा यांचा दिवस भल्या पहाटेच सुरू होतो. घरातील कामे उरकून आपल्या व्यावसायिक कार्याला बाहेर पडण्यापूर्वी घरातील पंधरा जीवांच्या सर्व गोष्टी मार्गी लावतात. पुणे शहरातील विविध रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याबरोबरच रोज दुपारनंतर पस्तीस कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी जातात. यासाठी दिवसभर किमान चाळीस किलोमीटरचा त्यांचा प्रवास होतो. सासवडपासून जवळ असलेल्या बोपदेव घाटाच्या खाली अस्करवाडी येथे त्यांनी पस्तीस कुत्र्यांची सोय केली असून रोज तेथे जाऊन त्यांच्याही खाण्यापिण्याची सोय त्या करतात. कुत्रे पाळण्याची हौस असून पाळू शकत नसाल, पण त्यांना खाऊ घालण्याची इच्छा असेल तर कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी, कार्यकर्ता म्हणून काम करायचे असेल किंवा पसारे यांचा उपक्रम बघण्यासाठी ९९२२८१९७४२ या क्रमांकाचा उपयोग होईल.

‘तुमची मदत तुमच्यासाठी’ या ब्रीदवाक्यावर आधारित हे कार्य समाजासाठी करीत असताना, समाजानेदेखील या कार्यात पुढाकार घेतल्यास समाजालाच मदत होईल असे अरुण म्हणतात. आपापल्या परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये पुढाकार घेतल्यास आपल्याच परिसरातील भटकी कुत्री वाढणार नाहीत याशिवाय त्यांना रेबीजचे लसीकरण केल्यास, त्यांच्या भुकेची व्यवस्था केल्यास अनेक समस्या सुटू शकतील, असा पसारे दाम्पत्याला विश्वाास आहे. त्यांची भूक भागल्यास ती आक्रमक जशी होणार नाहीत, तसेच लसीकरणाचा फायदाही मनुष्यालाच होईल असे ते म्हणतात. कुत्र्यांच्याबरोबरच गाढव, विविध पक्षी आणि अगदी सापाला जीवदान देणाऱ्या पसारे कुटुंबीय अनेक जीवांसाठी वरदान ठरले आहेत.

  • श्रीराम ओक