कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांकडे समाज एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहतो.. अशावेळी समाजाकडून मिळणारी वागणूक अनुभवताना त्या कैद्याची पावले पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात.. हा प्रश्न लक्षात घेऊन कैद्यांचे कारागृहात प्रबोधन करण्याचा अभिनव उपक्रम येरवडा कारागृहात सुरू केला जाणार आहे. शिक्षा पूर्ण केलेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने आणण्यासाठी येरवडा कारागृह आणि शंक रराव भोई प्रतिष्ठानने ‘प्रेरणापथ’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम येरवडा कारागृहात राबविण्यात येणार आहे. कै. शंकरराव भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलींद भोई, उदय जगताप आणि पोलीस उपायुक्त तुषार दोशी हे प्रेरणापथ उपक्रमाचे समन्वयक असतील. अॅड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते आदींनी हा उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले आहे. या उपक्रमाअंतर्गत साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, विज्ञान, प्रशासन या क्षेत्रांमधील मान्यवर कारागृहात जाऊन कैद्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ २५ जानेवारी रोजी येरवडा कारागृहात होणार असून, ह.भ.प. चारुदत्त आफळे हे यावेळी कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून कैद्यांशी संवाद साधणार आहेत.
कैद्यांना भावनिक आणि मानसिक आधार देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, नाना पाटेकर, विक्रम गोखले, सुरेश वाडकर, अलका कुबल, डॉ. विकास आमटे, डी. एस. कुलकर्णी, मंगेश तेंडुलकर, चंदू बोर्डे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, अनिस चिश्ती, संगीतकार प्यारेलाल शर्मा, आनंदजी शहा, रेणू गावस्कर यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी या उपक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती डॉ. मिलिंद भोई यांनी दिली.
कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्यांना मुख्य प्रवाहात सहभागी होताना अडचणी येतात. त्यांनी सन्मानाने जगावे तसेच त्यांच्या अंगभूत कौशल्याचा फायदा समाजाला व्हावा, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने कैद्यांच्या मानसिकतेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे, असेही डॉ. भोई यांनी नमूद केले.
येरवडा कारागृहात सध्या ३६०० कैदी आहेत. महिलांसाठी असलेल्या स्वतंत्र कारागृहात ३०० महिला आहेत. गेल्या काही वर्षांत पोलीस दलात आमूलाग्र बदल झाले. पोलिसांची संख्या वाढली तरी गुन्हेगारी कमी झालेली नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे मानसिक परिवर्तन करण्याची गरज आहे. सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृहाचे ब्रीद आहे. वाल्याचा वाल्मीकी झाला, हे विचारात ठेवून कैद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कारागृह प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत, असे कारागृह विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. कारागृहाच्या विशेष महानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यावेळी उपस्थित होते.
गुन्हेगारीचा शिक्का बसलेला प्रत्येकजण हा जन्मजात वाईट नसतो. काही कैद्यांमध्ये अंगभूत कौशल्ये असतात. त्यांच्या कौशल्याचा समाजाला फायदा होणे गरजेचे आहे. येरवडा कारागृहात सुरू करण्यात येत असलेला प्रेरणापथ हा उपक्रम राज्यातील अन्य कारागृहातदेखील सुरू करण्याचा मानस आहे.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय, कारागृह विभागाचे प्रमुख, अतिरिक्त पोलीस महासंचालक