News Flash

पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपले

मोबाईल टाॅवर आणि लोखंडी कमान पडल्याची घटना, शहरात दोन दिवस पावसाळी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता

पुणे शहर आणि परिसरला शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने झोडपले. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह शहरात जवळपास दीड तास जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. शहरात ठिकठिकाणी झाडं पडल्याच्या जवळपास पन्नास घटनांची नोंद करण्यात आली. तर, मंगळवार पेठेतील पराग  चौकात दिशादर्शक कमान कोसळली तसेच  मोबाइल टॉवर पडण्याची देखील घटना मंगळवार पेठमध्ये घडली.  सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही.

शहर आणि परिसरात शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजता पावसाला सुरूवात झाली. सिंहगड रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, कात्रज, धनकवडीसह मध्यवर्ती भागातील पेठांत वादळी वारा व विजांच्या गडगडाटात वादळी पाऊस सुरू झाला.  वादळी वाऱ्यांमुळे शहरात ठिकठिकाणी झाडे पडली.  दिशादर्शक फलक रस्त्यावर कोसळला  मात्र  लॉकडाउनमुळे रस्त्यावर गर्दी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. जंगली महाराज रास्ता , आपटे रास्ता , शनिवारवाडा, शिवाजीनगर पोलीस वसाहत, सिंहगड रस्त्या परिसरातील धायरी, वडगांव येथे झाडे कोसळली आतपर्यंत अशा 50 हुन जास्त घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. जोरदार पावसामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची मात्र मोठी तारांबळ उडाली. बंदोबस्तासाठी पोलिसांनी उभारलेल्या तंबूंना जोरदार वाऱ्याचा फटका बसला.

शहरात सायंकाळी मेघगर्जनेसह पाउस पडेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिला होता. मध्यभाग आणि उपनगरात पावसाने हजेरी लावल्यानंतर हवेत काही काळ गारवा निर्माण झाला. दोन ते तीन दिवसांपूर्वी शहरातील दिवसाचे कमाल तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले होते तर रात्रीही किमान तापमानात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, शहरात येत्या दोन दिवस पावसाळी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. गुरूवारी संध्याकाळीही शहरात पावसाचा शिडकावा झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 8:35 pm

Web Title: presence of heavy rains in pune msr 87 svk 88
Next Stories
1 Coronavirus : पुणे विभागात एकाच दिवसात 81 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू
2 “बारामती पॅटर्न नुसार कडक निर्बंध पाळून पुण्यातील रुग्ण संख्येला आळा घाला”
3 पिंपरी-चिंचवड : करोनामुक्त व्यक्तींचं स्वागत करणं माजी महापौरांना पडलं महागात
Just Now!
X