भारतीय शास्त्रज्ञाला ८३ वर्षांपूर्वी नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर असा सन्मान भारतीयांना अद्याप मिळाला नाही. ही परिस्थिती बदलणे गरजेचे असून, भारतीय शास्त्रज्ञ व संशोधकांनी नोबेल पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनी केले. परदेशात काम करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ व संशोधकांना देशात परत आणण्यासाठीही प्रयत्न व्हावेत, असेही ते म्हणाले.
‘डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ चा (डीआयएटी) सातवा पदवीदान समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाला. त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायणन, देशाचे संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टनी, राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन आहेर, संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. व्ही. के. सारस्वत, अॅटोमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष डॉ. पी. के. सिन्हा, ‘डीआयएटी’ चे कुलगुरू डॉ. प्रल्हाद आदी त्या वेळी उपस्थित होते. राष्ट्रपती व अॅन्टनी यांच्या हस्ते या वेळी ९० विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली.
राष्ट्रपती म्हणाले, ‘‘सन २०११ मध्ये दिल्या गेलेल्या पेटंटमध्ये भारतीयांना ४२ हजार पेटंट मिळाली. मात्र, अमेरिका व चीनला या वर्षांत मिळालेल्या पेटंटची संख्या आपल्यापेक्षा १२ पटीने अधिक आहे. असे का होते, याचा विचार व्हावा. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न हवेत. पेटंट मिळविण्याची क्षमता आपल्याकडे आहे. पण, ते मिळण्याच्या प्रक्रियेत काही दिरंगाई आहे. या दिरंगाईमुळे पेटंट मिळण्यावर परिणाम होत असेल, तर काही बदल करणे आवश्यक आहे.
संशोधन व शिक्षण व्यवस्थेबाबत राष्ट्रपती म्हणाले, ‘‘डीआयएटी’ सारख्या संस्थांची मोट बांधून संशोधनाच्या कामाला गती दिली पाहिजे. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेवरच भाविष्यातील प्रगती अवलंबून आहे. भारतात पूर्वी तक्षशीला, नालंदा, विक्रमशीला, वल्लभी, सोमापुरा, ओडंतापुरी अशी अनेक विद्यापीठे विश्वविख्यात झाली. पण, आज जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्येही भारतीय विद्यापीठांचा समावेश नाही. यावर विचार करून ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. संस्थांना त्यादृष्टीने बदल घडवून आणले पाहिजेत. सध्याच्या युवकांमध्ये क्षमता आहे. ही क्षमता लक्षात घेऊन नवनिर्मितीवर जास्तीत जास्त भर देणे गरजेचे आहे.
अॅन्टनी म्हणाले, ‘‘संरक्षण व सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण करण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यादृष्टीने उपाययोजना शोधल्या पाहिजेत. ‘डीआयएटी’ सारख्या संस्थांमधून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाचा फायदा देशातील सैनिकांना होणार आहे. अशा संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रबांधणीसाठी उपयुक्त शास्त्रज्ञ निर्माण होतील, असा विश्वास आहे.