हॉटेलमध्ये मोरीवाला म्हणून भांडे घासण्याच्या कामापासून सुरुवात केल्यानंतर झटपट पैसा मिळविण्याच्या हव्यासाने फसवणुकीचा ‘उद्योग’ सुरू केलेला तो काही दिवसातच केंद्रीय अधिकारी म्हणून चक्क लाल दिव्याच्या मोटारीत फिरू लागला. अनेकांना टोप्या घालत त्याने कोटय़वधीची माया जमा केली, पण अखेर या तोतयाचे सोंग उघड झाले अन् पोलिसांनी त्याला गजाआड पाठवले. विशाल पांडुरंग ओंबळे (वय ३८, रा. स्पार्टन एनक्लेव्ह, येरवडा) असे या तोतयाचे नाव असून, दिमतीला बाऊन्सर, सुरक्षा रक्षक, महागडय़ा मोटारी घेऊन फिरणाऱ्या या भामटय़ाने केंद्र शासनाच्या योजनेतून कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
मागील काही दिवस लोकांना गंडा घालत फिरणारा ओंबळे काही दिवसांपूर्वी लष्कर परिसरात एका मोबाईल शॉपीत आला होता. केंद्र शासनाचा व्हिजिलन्स ऑफिसर असल्याची बतावणी त्याने केली. मोबाईल शॉपीच्या मालकाला त्याने पिस्तुलाचा धाकही दाखवला होता. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक सतीश निकम व कर्मचाऱ्यांनी ओबळेला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याच्या फसवणुकीच्या ‘उद्योगा’चा पर्दाफाश झाला. त्यानुसार पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर सहा गुन्हे दाखल झाले आहेत.
वसई, विरार, ठाणे भागामध्येही त्याने नागरिकांची एक कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही निष्पन्न झाले. ओबळेवरील पुण्यातील गुन्ह्य़ांविषयी बोलताना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील म्हणाले, ओबळे हा शीघ्रकोपी असून, तो लोकांना धमक्या द्यायचा. त्याच्यावर सहा गुन्हे दाखल असून, त्यात त्याने ६७ लाखांची फसवणूक केली आहे. त्याच्याकडून ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ओंबळे हा दहावी नापास आहे. नापास झाल्यानंतर त्याने हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम केले. त्यानंतर तो हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करू लागला. तीन वर्षांपूर्वी त्याने जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवसायात हात घातला. मात्र, त्यात त्याला तोटा झाला. हा तोटा भरून काढण्यासाठी त्याने एक कर्ज मिळविण्याचा प्रयत्न केला. हे करीत असताना अनेकांना अशा प्रकारे कर्जाची गरज असते, हे त्याने हेरले. त्यातून त्याने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविण्याच्या प्रकाराला सुरुवात केली.
केंद्रीय अधिकाऱ्याचे रूप धारण करून त्याने वसई, विरार, ठाणे परिसरात अनेकांना गंडा घातला. मोठय़ा दिमाखात लाल दिव्याच्या गाडीतून तो फिरत असल्याने लोकही त्याच्या जाळ्यात अडकत गेले. कर्जासाठी सुरुवातीला दहा टक्के रक्कम भरावी लागत असल्याचे सांगून त्याने पैसे उकळले. या व्यक्तीविषयी काही तक्रार असल्यास पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्याशी ९१५८४४५५५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाऊन्सरसाठी २८ लाख अन् २० लाखांचे छमछम!
विशाल ओंबळे या तोतयाने फसवणुकीतून सव्वाचार कोटीहून अधिक माया जमा केली. छाप पाडण्यासाठी त्याने बाऊन्सर व सुरक्षा रक्षकही ठेवले होते. त्यांच्यावर त्याने तीन वर्षांमध्ये २८ लाख रुपये खर्च केले आहेत. इतकेच नव्हे, तर डान्सबारमध्ये छमछमवर १५ ते २० लाख रुपये उधळल्याचेही तपासात स्पष्ट झाले. महागडी मोटार घेण्यासाठी १६ लाख, मित्राला १ कोटी १६ लाखांचे उसने, विमान प्रवासावर १० ते १२ लाख, मुलाच्या शाळेसाठी आठ लाख व कर्करोग झालेल्या आईवरील उपचारासाठी ६० लाख रुपये ओंबळेने खर्च केल्याचेही उघड झाले आहे.