पीएमपीने तयार केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिल्यामुळे पीएमपीची दरवाढ बुधवार (१३ मार्च) पासून अमलात येणार आहे. नव्या निर्णयानुसार दुसऱ्या टप्प्यापासून (स्टेज) प्रत्येक टप्प्यास एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपी तिकिटाचा दर आता पाच ते ३४ रुपये असा होईल. मासिक पासच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
डिझेलचे दर तसेच सुटय़ा भागांच्या किमतीमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे पीएमपीचा तोटा सातत्याने वाढत असून तो भरून काढण्यासाठी तिकिटांचे दर वाढविण्याचा प्रस्ताव पीएमपी संचालक मंडळाने तयार केला होता. या प्रस्तावाला परिवहन प्राधिकरणाने मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता दिली. त्यामुळे तिकिटांची दरवाढ बुधवारपासून लगेचच अमलात येईल.
पीएमपीचे किमान तिकीट सध्या पाच रुपये आहे. दुसऱ्या टप्प्यापर्यंत (दोन किलोमीटर) असलेले हे तिकीट कायम ठेवण्यात आले आहे. त्यापुढील प्रत्येक टप्प्याला एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीचे किमान तिकीट आता पाच रुपये (अंतर दोन किलोमीटर), तर कमाल तिकीट ३४ रुपये (अंतर ६० किलोमीटर) होईल. तसेच हद्दीबाहेरील प्रवाशांकरिता एक रुपया जादा दर लागू राहील.
पीएमपीच्या दैनिक पासचा दर कमी करण्यात आला आहे. महापालिका हद्दीचा दैनिक पास ७० वरून ५० रुपयांना, तर हद्दीबाहेरील पासही ७० वरून ५० रुपयांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीचा दैनिक पास ३० वरून ४० रुपये करण्यात आला आहे, तर साप्ताहिक पास ३०० वरून ३५० रुपये करण्यात आला आहे. विद्यार्थी मासिक पास ५०० वरून ६०० रुपये करण्यात आला असून ज्येष्ठ नागरिकांचा मासिक पासही ३५० वरून ४५० रुपये करण्यात आला आहे. मनपा सेवकांचा पास ६०० वरून ७०० रुपये, तर महापालिका हद्दीबाहेरचा पास एक हजार रुपयांवरून १२०० रुपये आणि दोन्ही हद्दींबाहेरचा पास १२०० वरून १५०० रुपये करण्यात आला आहे.
पीएमपीला सध्या रोज ७२ हजार लिटर डिझेल लागते. त्याचा महिन्याचा खर्च चार कोटी ७४ लाख, तर वार्षिक खर्च ५६ कोटी इतका आहे. या दरवाढीमुळे प्रतिदिन १३ लाख रुपयांचे उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे. त्यातील नऊ लाख रुपये तिकीट विक्रीतून तर चार लाख रुपये पास विक्रीतून मिळतील. डिझेल दरवाढीमुळे पीएमपीला वार्षिक ५९ कोटीचा बोजा पडत असून दरवाढीमुळे ४७ कोटी रुपये वसूल होतील आणि ११ ते १२ कोटींची तूट येत राहील, असा अंदाज आहे.

 दरवाढीवर दृष्टिक्षेप..
– सहा रुपयांपासून प्रत्येक तिकिटात एक रुपयांची वाढ
 -किमान तिकीट पाच, तर कमाल तिकीट ३४ रुपये
– दैनिक पासच्या दरात २० रुपयांची कपात
– विद्यार्थी मासिक पास १०० रुपयांनी महाग
– ज्येष्ठ नागरिकांचा पासही १०० रुपयांनी महाग