16 December 2019

News Flash

बैलाची किंमत साडे सोळा लाख!

टोकदार शिंगे, काळीशार नखे, काटक शरीरयष्टी असे या बैलाचे वैशिष्टय़ आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मावळात एका शेतकऱ्याने शर्यतीच्या बैलासाठी तब्बल साडेसोळा लाख रुपये मोजले आहेत. नवे सरकार बैलगाडा शर्यतींवर बंदी उठवेल, असा ठाम विश्वास वाटल्यामुळे इतकी किंमत देण्याचे धारिष्टय़ या शेतकऱ्याने दाखवले आहे.

मावळातील नवलाख उंबरे गावातील सधन शेतकरी पंडित जाधव यांनी काही दिवसांपूर्वी हा बैल खरेदी केला. टोकदार शिंगे, काळीशार नखे, काटक शरीरयष्टी असे या बैलाचे वैशिष्टय़ आहे. काही सेकंदात शर्यतीचा घाट सर करताना जाधव यांनी या बैलाला जेव्हा पाहिले, तेव्हाच कोणतीही किंमत देऊन तो खरेदी करण्याचे त्यांनी ठरवले होते.

काही दिवसांपूर्वी दुष्काळी परिस्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि चाराटंचाईमुळे अवघ्या ३० ते ४० हजारापर्यंत शर्यतीचे बैल विकले जात होते. आता शर्यतीच्या एका बैलासाठी तब्बल साडेसोळा लाख रुपये किंमत देण्यात आल्याने परिसरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

जाधव कुटुंबाचे र्शयतीच्या बैलांवरचे प्रेम तीन पिढय़ांपासून चालत आले आहे. नव्या बैलासाठी दूध, अंडी, चारा, भरडा, आंबोण असा दमदार खुराक दिला जात असून बैलांच्या शिंगांची, केसांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्याला नियमित मसाज केला जात असून रोज गरम पाण्याने आंघोळ घातली जाते.

शर्यतींवरील बंदी नवे सरकार नक्की उठवेल, अशी खात्री वाटल्याने मोठी किंमत देऊन बैल विकत घेतला. मुलाप्रमाणे बैलांची काळजी घेण्याची आमची परंपरा आहे.

– पंडित जाधव, शेतकरी

बैल आणल्यापासून दिवाळीचे वातावरण आहे. पाहुण्यांची सतत वर्दळ सुरू आहे. बैलाची छायाचित्रे तसेच सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची चढाओढ सुरू असते.

– आशा जाधव, गृहिणी

शर्यतींवर बंदी येण्यापूर्वी माळशिरस येथे एका शेतकऱ्याने २० लाख रुपये खर्च करून बैल विकत घेतला होता.

– रामकृष्ण टाकळकर, समन्वयक, बैलगाडा संघटना

First Published on December 2, 2019 12:30 am

Web Title: price of the bull is sixteen and a half million abn 97
Just Now!
X