News Flash

महागाईच्या झळा!

पेट्रोल अणि डिझेलच्या दरात गेल्या चार महिन्यांत सातत्याने वाढ होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मालवाहतूकदारांकडून २० ते ३० टक्के भाडेवाढीचा निर्णय; फळभाज्यांसह सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार

पुणे : डिझेल आणि पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत असून गेल्या चार महिन्यांत डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. डिझेल दरवाढीमुळे मालवाहतूकदारांकडून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुडस् ट्रान्ससपोर्ट असोसिएशनकडून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंगळवारपासून भाडेवाढ लागू झाली आहे. या भाडेवाढीमुळे भाजीपाल्यासह अन्नधान्याचे दर वाढणार आहेत.

दि पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुडस् ट्रान्ससपोर्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीत एकमताने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या दरात वीस ते तीस टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राम कदम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

कदम म्हणाले, पेट्रोल अणि डिझेलच्या दरात गेल्या चार महिन्यांत सातत्याने वाढ होत आहे. पुणे शहरात प्रतिलीटर डिझेलचा दर ७२ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. डिझेलचा खर्च, वाहतूक खर्च, वाहकांचा पगार तसेच टोल खर्च विचारात

घेऊन ही भाडेवाढ करण्यात आली आहे. मालवाहतूक करणारी जड वाहने (ट्रक, कंटेनर) एक लीटर डिझेलमध्ये साधारपणे पाच ते सहा किलोमीटर अंतर कापतात. हलकी मालवाहतूक वाहने (टेम्पो, पिकअप) सहा ते सात किलोमीटर अंतर कापतात. डिझेल दरवाढीमुळे भाडेदरवाढ करण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही. मालवाहतूकदारांनी भाडेवाढ केल्यानंतर साहजिकच फळभाज्या, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य वस्तूंच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मालवाहतुकीचे अर्थकारण

दि पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुडस् ट्रान्ससपोर्ट असोसिएशन ही संघटना पन्नास वर्षे जुनी आहे. पुणे जिल्हय़ातील मालवाहतूकदारांचे प्रतिनिधित्व ही संघटना करते. संघटनेचे ५८० सभासद आहेत. मालवाहतूक करणारी जड वाहने शंभर किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिकिलोमीटर ३५ ते ४० रुपये भाडे आकारतात. त्यानंतर जेवढे अंतर वाढत जाते त्याप्रमाणे प्रतिकिलोमीटर वाहतुकीचा खर्च कमी होतो. जवळच्या अंतरावर केली जाणारी मालवाहतूक परवडणारी नसते. परराज्यात तसेच परगावात केली जाणारी वाहतूक परवडणारी असते. त्यात माल पोहोचविल्यानंतर तेथून ट्रक किंवा कंटेनर रिकामा परत येणे परवडणारे नसते. रिकामे वाहन परत आणताना इंधन खर्च मालवाहतूकदारांना करावा लागतो. टोलचा खर्च प्रतिकिलोमीटर चार ते पाच रुपये येतो. इंधनखर्च, चालकाचा पगार, देखभाल दुरुस्ती या बाबी विचारात घेणे गरजेचे असते, असे संघटनेचे अध्यक्ष राम कदम यांनी सांगितले.

वाहतूकदार नाराज

डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहतूकदारांकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. वाहतूक खर्चात वाढ होणार असल्यामुळे फळभाज्या, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतील असे दि पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी स्पष्ट केले. नोटाबंदीनंतर बाजारावर परिणाम झाला आहे. त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आला. व्यापाऱ्यांचा वेळ लिखापढीत जात आहे. त्यापाठोपाठ ईवे बिलची अंमलबजावणी करण्यात आली. पन्नास किलोमीटर अंतरावर माल पाठवल्यास मालाचा प्रकार, कोणाला पाठविला जाणार आहे, त्याचे नाव या सर्व बाबी ईवे बिलमध्ये समाविष्ट कराव्या लागतात.  मालवाहतूकदार एका वेळी दोन ते तीन व्यापाऱ्यांचा माल घेऊन जातो. ईवे बिलमध्ये त्रुटी असल्यास मालवाहतूक करणारे वाहन जप्त करण्याची तरतूद आहे. नवीन नियम, डिझेल दरवाढीचा परिणाम व्यापारावर झाला असल्याचे ओस्तवाल यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 1:51 am

Web Title: prices of essential commodities increase in pune due to fuel price hike
Next Stories
1 शहरबात पिंपरी : वैद्यकीय सेवेचा बट्टय़ाबोळ
2 पिंपरीतील अग्निशामक दलाचा गोरखधंदा
3 आपल्याच प्रतिमेला पंतप्रधानांची दाद
Just Now!
X