महाविद्यालयीन युवकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात सोमवारपासून (१८ जानेवारी) होत आहे. पुणे आणि औरंगाबाद केंद्राची प्राथमिक फेरी रंगणार आहे. या वर्षीही या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
गेल्या वर्षी राज्यभरात रंगलेल्या या स्पर्धेला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील घडामोडींबाबत तरुणाई आपल्या शैलीत व्यक्त झाली. या स्पर्धेच्या या वर्षीच्या पर्वाची सुरुवात सोमवारी होत आहे. ‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या या स्पर्धेची सुरुवात औरंगाबाद आणि पुणे केंद्रापासून होत आहे. या केंद्राची प्राथमिक फेरी सोमवारी रंगणार आहे. ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’, ‘मांडके हिअरिंग सव्र्हिसेस’, ‘इंडियन ऑइल’ यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत असून ‘युनिक अॅकॅडमी’ आणि ‘स्टडी सर्कल’ या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर आहेत.
पुणे केंद्रातील प्राथमिक फेरीसाठी ११० स्पर्धक आपले विचार मांडणार आहेत. गरवारे वाणिज्य महाविद्यालयामध्ये ही स्पर्धा होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडबरोबरच जिल्ह्य़ातील महाविद्यालयातील विद्यार्थीही सहभागी झाले आहेत. औरंगाबाद विभागाची प्राथमिक फेरी सोमवारी व मंगळवार अशी दोन दिवस घेण्यात येणार आहे. देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात होणाऱ्या या फेरीत ४७ महाविद्यालयांमधील ८५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. यात मराठवाडय़ातील ७५ व खान्देशातील १० स्पर्धकांचा समावेश आहे. दिग्गज परीक्षकांकरवी विद्यार्थ्यांना पारखण्यात येणार आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर अशा आठ केंद्रांवर तीन टप्प्यांमध्ये ही स्पर्धा होणार असून प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेले वक्ते विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. ही फेरी राज्यभरात २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. आठही विभागांतून निवडण्यात आलेल्या वक्तयांची १४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे महाअंतिम फेरी रंगणार आहे.