करोनावरील लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (२८ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत अधिकृत माहिती मंगळवारी सायंकाळपर्यंत मिळाली नव्हती. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आल्याचे राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर विविध देशांचे राजदूतही पुणे दौऱ्यावर येत आहेत.

अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड  विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूटकडून घेण्यात येत आहे. चाचण्यांचे विविध टप्पे प्रगतिपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप दौऱ्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेली नाही. मात्र, दौऱ्याची तयारी करण्याबाबत कळवण्यात आले आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.