करोना विषाणू या आजारावर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट लस तयार करीत आहे. त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शनिवारी एक वाजता भेट देणार होते. मात्र त्या वेळेत बदल झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोविशिल्ड लस तयार करण्यात येत आहे. त्या लशीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उद्या पंतप्रधान मोदी हे दुपारी १ ते २ या वेळेत येणार होते. मात्र त्या वेळेमध्ये बदल झाला असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी चार वाजता सिरम इन्स्टिट्यूट ला भेट देणार आहे. त्यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी ते संवाद साधणार आहेत.

तर आणखी एका नियोजित दौऱ्यात बदल झाला असून ४ डिसेंबर रोजी १०० देशांचे राजदूत देखील या ठिकाणी येऊन कोविड लशीबाबत सध्य परिस्थितीचा आढावा घेणार होते. मात्र हा नियोजित दौरा काही कारणास्तव रद्द झाला असल्याची माहिती आज दुपारीच जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे.