पुण्यातील इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापकाने १४ वर्षांच्या मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वानवाडी पोलिसांनी मुख्याध्यापक आणि शाळेतील समुपदेशक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील खासगी इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापक विन्सेट परेराविरुद्ध १४ वर्षांच्या मुलाच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. मार्च महिन्यात विन्सेटने १४ वर्षांच्या मुलाला शाळेतील विश्राम कक्षात बोलावून त्याच्यासोबत अश्लील वर्तन केले. परेराने विद्यार्थ्याला स्वत:च्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ देखील दाखवले. मुलाने हा प्रकार शाळेच्या समुपदेशिकेला सांगितला होता. मात्र, तिने याबाबत बाहेर भाष्य करु नकोस, असे सांगत प्रकरणावर पडदा टाकला. नोकरी जाईल या भीतीपोटी तिने अशी भूमिका घेतल्याचे आता समोर आले आहे.

वानवाडी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी पीडित मुलाच्या पालकांशी संपर्क साधला. मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल या भीतीपोटी त्यांनी देखील तक्रार दाखल केली नव्हती. अखेर पोलिसांनी मुलाच्या आई – वडीलांना तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. यानुसार मुलाच्या पालकांनी पोलिसाकंडे तक्रार दिली. पोलिसांनी दोघांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.