येरवडा येथील मनोरुग्णालयात मानसिक चाचण्यांसाठी कारागृहातून पाठविण्यात आलेला कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पसार झालेल्या कैद्याने मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका अल्पवयीन रुग्णाची मदत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पसार झालेला कैदी दीपेश अजित काळे (वय २१) याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरुग्णालयातील कर्मचारी राजेश पिहाट (वय ५०) यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काळे हा एका गुन्ह्य़ात न्यायालयीन बंदी आहे. कारागृहात काळे याच्या वर्तनात काही बदल जाणवल्याने त्याला काही मानसिक चाचण्यांसाठी येरवडय़ातील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २७ मे रोजी मनोरुग्णालयातील वॉर्डातून काळे
पसार झाला. कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास नुकताच हा प्रकार आला आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत काळे याला पसार होण्यासाठी मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. काळे याला मनोरुग्णालयात देण्यात आलेल्या चादरीचा त्याने दोरीसारखा वापर केला तसेच मनोरुग्णालयातील प्रवेशद्वारालगत असलेल्या भिंतीवरून चढून जाण्यासाठी त्याने अल्पवयीन मुलाची मदत घेतल्याचे चौकशीत उघड झाले आहे, अशी माहिती येरवडा पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक कु ताळ तपास करत आहेत.