बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्यातील दोषींना पॅरोल किंवा फर्लो रजा न देण्याच्या नवीन नियमाचा आता विरोध सुरु झाला आहे. या निर्णयाविरोधात पुण्यातील येरवडा कारागृहातील १०० कैद्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आजपासून हे कैदी उपोषणाला बसले आहेत.

येरवडा कारागृहातील कैद्यांनी कारागृह प्रशासनाला एक निवेदन दिले होते. यात कैद्यांनी नवीन नियमांना विरोध असल्याचे म्हटले होते. मात्र आज या कैद्यांना नेहमीप्रमाणे जेवण देवण्यात आले. यातल्या काही जण जेवले. तर १०० जणांनी जेवणास नकार दिला. पॅरोल आणि फर्लो रजा मिळवणे हा आमचा अधिकार आहे आणि तो असा हिरावून घेता येणार नाही असे या कैद्यांचे म्हणणे आहे.

गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचाराला लगाम घालण्यासाठी यापुढे बलात्कार, खून दहशतवाद, लहान मुलांचे खंडणीसाठी केलेले अपहरण आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आरोपींना यापुढे पॅरोल न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे अन्य गुन्हे केलेल्या कैद्यांना देण्यात येणाऱ्या पॅरोलमध्ये कपात करण्यात येणार असून वार्षिक ९० दिवसांऐवजी आता ४५ दिवसांसाठी तो दिला जाईल, तर फर्लोचा कालावधी २८ दिवसांवरून २१ दिवस करण्यात आला आहे. तसेच पॅरोलचा कालावधी शिक्षेत गृहीत धरला जाणार नसून या कालावधीसाठी तुरुंगवास भोगावा लागेल. राज्य सरकारच्या या नियमाविरोधात कैद्यांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.  मुंबईतील वडाळा येथे काही वर्षांपूर्वी सज्जाद मुघल या व्यक्तीने पल्लवी पुरकायस्थ या तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या खटल्यात शिक्षा झालेला सज्जाद पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झाला होता. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी सरकारने पॅरोल आणि फर्लो रजेच्या नियमात बदल करण्याची घोषणा केली होती.